विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारकाला भेट दिली. दरम्यान तेथील अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी संबोधित केले. ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, त्या महामानावाच्या स्मारकासाठी चैत्यभूमीवर एक इंचही जागा मिळू नये हे दुर्दैव आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच रामदास आठवले यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागेसंबंधी भेटलो तेव्हा तीन दिवसात २३०० कोटी रुपयांची जागा त्यांनी एकही रुपया न घेता महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत केली. त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंदू मिलच्या जागेवर ते काम सुरु आहे आणि येत्या काळात ते काम पूर्ण होईल, असे फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्या ठिकाणी राहून शिक्षण घेतले त्या ठिकाणाचा लिलाव होत होता. त्या लिलावाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नव्हता. शेवटच्या काही दिवसात आम्ही ते घर महाराष्ट्र सरकारच्या वतीने खरेदी केले. तिथल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांची जर्मन पत्रेही उपलब्ध आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वीकारणार हिंदू धर्म…वाचा सविस्तर
वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली
भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन
संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत तेव्हा त्यांनी दिलेले जे भाषण आहे ते आजही द्यावे अशी आज परिस्थिती आहे. संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गाने चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गाने चाललेला आहे. मात्र, काही संकुचित वृत्तीची माणसे त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या १० वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो. देशासमोरील सर्व प्रश्नांची उत्तरे संविधानात आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चिंचोलीचे वामनराव गोडबोले यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही वस्तू जपून ठेवल्या होत्या. १९९९ला आमदार झालो तेव्हा त्यांची भेट घेतली आणि त्या वस्तूंच्या जतनासाठी काम केले. नरेंद्र मोदींच्या सहकार्यानं त्या वस्तू जतन करण्याचा प्रयत्न केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अभिप्रेत अशा पद्धतीने काम केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.