महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली असून दुसऱ्यांदा ते विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली तर तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या १२ कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. शिवाय विरोधी पक्षाचेही आभार कारण त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पूर्ण समर्थन दिलं. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली. अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता. आता तुमच्या रुपाने आणखी वकील विधानसभेत आहे. राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंचे विशेष आभार कारण त्यांनी वाट मोकळी केल्याने ते अध्यक्ष झाले,” अशी मिश्कील टिपण्णी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राहुल नार्वेकर यांनी विधानपरिषदेतही काम केलं असून कायदेमंडळाचा अध्यक्ष असलेल्या व्यक्तीला कायद्याचे बारकावे माहित असणं महत्त्वाचं आहे. मागील काही घडामोडींमुळे विधानसभा अध्यक्षांकडे माध्यमांचे विशेष लक्ष होतं. कदाचित सर्वाधिक चर्चेत राहिलेले राहुल नार्वेकरच होते. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे ही आनंदाची बाब आहे, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा :
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवाड्यावर बंडखोरांचा ताबा
चिन्मय कृष्णा दास यांच्यासह शेकडो समर्थकांवर गुन्हा दाखल
मेघालयचे डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना आज ‘अवर नॉर्थ ईस्ट इंडिया ऍवॉर्ड २०२४’ होणार प्रदान
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान मिळवणाऱ्या चौघांपैकी राहुल नार्वेकर हे एक आहेत. युवा वयात विधानसभा अध्यक्ष झाले असून त्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. सभागृहाचं कामकाज नियम, प्रथा, परंपरेनुसार चालते. सभागृहात अनेकदा पेच प्रसंग येतात. कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे विरोधकांना येते. अध्यक्षांना नव्हे तर सरकारला अडकवायचे असते. अडीच वर्षात अध्यक्षांनी वेगळी कारकिर्दी आणि प्रतिमा तयार केली,” असं फडणवीसांनी सांगितले.