राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचाली वेगाने सुरू असून आता उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उलटून गेली आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदार संघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यावरून महायुतीकडून त्यांना पाठींबा दिला जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका याबाबतीत स्पष्ट केली आहे.
मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे ही स्पष्ट भूमिका भाजपाची होती आणि आहे. राज ठाकरेंनी त्याठिकाणी मागील निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला मग एका जागेवर त्यांना मदत लागणार असेल तर दिली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. देवेंद्र फडणवीसांआधी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही अशीचं भूमिका मांडली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अमित ठाकरेंना मदत करावी असं मत भाजपाचं होतं आणि आहे. मुख्यमंत्र्यांचेही मत त्यापेक्षा वेगळे नाही. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. एखादी जागा अदलाबदल करून घेऊ असंही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तो प्रयत्न करून पाहिला. तिथले जे उमेदवार आहेत त्यांना बोलवून चर्चा केली पण त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मत असं आहे की, जर ते लढले नाहीत तर ती मते थेट उबाठाकडे जातील. त्यातून दोघांचे नुकसान होईल. त्यामुळे उमेदवार दिला,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हे ही वाचा :
मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये
मलिकांना उमेदवारी नको म्हटलं, ऐकलं नाही, आता शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम करू!
घुसखोर रोहिंग्यांना हवा आहे शाळेत प्रवेश, पण…
उत्तराखंडमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट; हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या ट्रॅकवर सापडला डिटोनेटर
माहीम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे. शिवाय मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे.