लांगुलचालन करत असतील तर उद्धव ठाकरेंना याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कठोर टीका

लांगुलचालन करत असतील तर उद्धव ठाकरेंना याचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल

उद्धव ठाकरे यांची मालेगावात होणारी सभा लक्षात घेता त्याठिकाणी उर्दू भाषेतील काही बॅनर लागले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांच्यावर शरसंधान केले. लांगुलचालनासाठी उद्धव ठाकरेंना आज ही स्थिती पाहावी लागली, अशी टिप्पणी उद्धव ठाकरेंवर करण्यात आली.

या बॅनरवर ‘अली जनाब उद्धव ठाकरे’ असे लिहिण्यात आले असून त्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले आहे. फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना शोभते का? हे त्यांनाच विचारा. फडणवीस म्हणाले की, उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.

फडणवीस यांनी केलेल्या या टिप्पणीनंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले की, जावेद अख्तर आणि गुलजार हेदेखील उर्दूत लिहितात. ही एक भाषा आहे. ते आपले लिखाण उर्दूतूनच करतात. संजय राऊत यांनी हे उत्तर दिले पण त्यांनी एकप्रकारे अली जनाब उद्धव ठाकरे या वाक्याचे समर्थनही त्यामाध्यमातून केले. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे त्या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे. कदाचित या सभेत फडणवीस यांच्या या टीकेवर उद्धव ठाकरे उत्तर देतील अशी शक्यता आहे.

हे ही वाचा:

सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!

आठ वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

तीन वर्षांपूर्वी तत्कालिन शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत महाविकास आघाडीत स्थापित केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये बदल झाल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर तत्कालिन शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नमाज पठणाची स्पर्धा ठेवली होती. तसेच शिवसेनेचे उर्दूतील कॅलेंडरही छापले गेले होते. उर्दू भवन बांधण्याचा निर्णयही महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आला होता.

भाजपाची साथ सोडल्यानंतर आता मतांसाठी मुस्लिम मतदारांना जवळ करण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी आरंभिले आहे, अशी टीका होऊ लागली. त्यातच मग माझगाव येथे १२.८८ कोटी खर्च करून उर्दू भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका होऊ लागली. मुंबई उपनगरातील एका उद्यानाला टिपू सुलतान असे नामकरण केले गेले. तेव्हाही त्याला तत्कालिन शिवसेनेकडून विरोध झाला नाही. त्या सरकारच्या काळात दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीला विद्यतरोषणाई केल्याचे उघड झाले होते पण त्यावरही उद्धव ठाकरे यांनी गप्प बसणे पसंत केले होते.

अगदी प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केले नाही. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याआधी घेतलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात येणार असल्याची घोषणा अखेरच्या कॅबिनेटमध्ये केल्याचे म्हटले होते. अडीच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी असतानाही ती पूर्ण केली नसल्याबद्दल उद्धव ठाकरे लक्ष्य होत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम मतांना धक्का बसणार नाही, याची काळजी कायम घेतली असा आरोप आता उर्दू भाषेतील बॅनरच्या निमित्ताने भाजपाकडून केले जात आहेत.

Exit mobile version