देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई कोस्टल रोडचे (वरळी ते मरिन लाईन्स सागरी सेतू मार्ग) सोमवार, ११ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी कोस्टल रोडच्या श्रेयावरून वादही रंगला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
कोस्टल रोडच्या कामात वसुली सुरू होती
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काही लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आला,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. “या कार्यक्रमाला अजित गुलाबचंद आणि एल ऍण्ड टी चे देसाई उपस्थित आहेत. पण, त्यांना पुढेही काम करायचे आहे त्यामुळे ते काही बोलणार नाहीत. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. अजित आणि देसाई यांची काही माणसं तेव्हा सातत्याने येऊन तक्रार करायचे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचे काम कसे करायचे हे सांगितले होते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोस्टल रोडच्या कामात कशाप्रकारे वसुली केली जायची याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला.
उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवून पार पाडल्या
देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. “मला काल समाजमाध्यमावर बघायला मिळालं की उबाठाचे बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही,” अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केली.
भूमिपूजन करताना मुख्यमंत्री असूनही ठाकरेंनी बोलावलं नाही
“आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही केलं आम्ही केले. ज्यावेळी भूमिपूजन करायचं होतं त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो परंतु, उद्धव ठाकरेंनी मला बोलवलं देखील नाही. त्यावेळी सगळं रोखू शकलो असतो. पण तसे केले नाही. एक देवेंद्र फडणवीस येईल आणि जाईल परंतु नाव कायम राहील. कोण कोत्या मनाचे आणि कोण मोठ्या मनाचे, हे पाहायला मिळेल,” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
दिल्लीतून हात हलवत परत यायचे
“कोस्टल रोड बांधताना नेहमी सीआरझेडचे नियम आडवे यायचे. सीआरझेडचा विषय होता त्यावेळी मागच्या सरकारमधले दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. पण, मी सत्तेत असताना पुढाकार घेतला. आम्ही केंद्राला शब्द दिला होता की, आम्ही या ठिकाणीं सगळी ग्रिनरी करु.नरेंद्र मोदी यांनी सांगून देखील काही अधिकारी अडचणी आणत होते. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल झाल्या मात्र आम्ही सगळीकडे जिंकलो,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस म्हणतात.
हे ही वाचा..
‘नजीकच्या भविष्यात इस्रोची अध्यक्ष महिला होईल’
ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह!
आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात लगबग; पाच दिवसांत ७३० शासन निर्णय जारी
कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
उद्धव ठाकरेंनी कोळी बांधवांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही
“कोस्टल रोड पूर्ण झाला कारण राज्यात सत्ताबदल होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. नाहीतर आणखी काही वर्षे कोस्टल रोडचे बांधकाम रखडले असते. पण, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व सूत्रे हातात घेत अडचणी दूर केल्या. कोळी बांधवांनी कोस्टल रोडच्या दोन खांबांमधील अंतर वाढवण्याची विनंती केली. उद्धव ठाकरेंनी कोळी बांधवांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. उलट एकनाथ शिंदे यांनी बैठक लावून कोळी बांधवांची खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी मान्य केली,” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणावेळी कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे आणि इक्बालसिंह चहल यांचेही त्यांनी कौतुक केले.