राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात बोलताना अनेक राजकीय गोष्टींचा आणि घडामोडींचा उलगडा केला. सत्ताबदल झाल्यानंतर त्यांच्या मनात काय सुरू होते? ते आगामी लोकसभेसाठीचे लक्ष्य आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे मत अशा अनेक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणं अशक्य
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर यावेळी जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती करणं शक्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं आहे. राजकीय मतभेद मिटवता येतात पण, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं नाही. आमची मनं दुखावली आहेत. सध्या दिवसरात्र ठाकरे आणि त्यांचे नेते नरेंद्र मोदींना शिव्या देत असतील तर कसे काय त्यांच्यासोबत जाणार? रोज मोदींना शिव्या दिल्या नाहीत तर त्यांना अन्न पचत नाही. काही लोक त्यांनी असे सोडले आहेत जे ९ वाजता भोंगा सुरु करतात आणि संध्याकाळपर्यंत तेच करतात. त्यामुळे आता त्यांच्यासह काहीही झालं तर जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. २५ वर्षे ज्यांच्याशी सुखं दुःखं वाटली ते लोक पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसतात आणि वाईट वागणूक देतात तेव्हा मनं दुखावली जातात, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पाच वर्षे सत्तेत एकत्र असताना कधीही त्यांना टाळलं नाही. त्यांच्या फोनला उत्तरे दिली. मात्र, २०१९ मध्ये मी निकालानंतर जेव्हा त्यांना फोन केले तेव्हा त्यांनी घेतलेच नाहीत. शिवाय त्यांनी आपण सोबत नसल्याचेही सांगितले नाही. मैत्रीचे दरवाजे ठाकरेंनी बंद केले. त्यानंतर औपचारिक बोलणं कधीही झालेलं नाही. समोरासमोर भेट झाली तर कसे आहात विचारतो. तेवढी कर्टसी अजूनही महाराष्ट्रात आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
गेल्या लोकसभेत जिंकलेल्या जागांपेक्षा कमी जागा येणार नाहीत
“लोकसभा निवडणुकीत आव्हानं नाहीत, असे कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. याच्याहून अधिक जागा मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार. गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोन वेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही,” असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार नव्हतो
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार नव्हतो. मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले तर लोक सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील, अशी शंका मनात होती. पण भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशी बोलल्यानंतर मनातील शंका दूर झाली आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले,” अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली.
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा होता. त्यामुळे याबाबत मला तयार करण्याचा प्रश्नच नव्हता. मी नेत्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, आपल्याला हे सरकार मजबुतीने चालवायचे असेल आणि आपल्यासोबत येणाऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागेल. केंद्रीय नेत्यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!
सत्तेबाहेर राहण्याची इच्छा असल्याचेही केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा चर्चा केली आणि सांगितले की सरकार चालवायचं असेल तर ते बाहेरुन चालवता येत नाही. समांतर संवैधानिक व्यवस्था म्हणून काम करू शकत नाही. एक नेता म्हणून मनात शंका असल्याचं एक कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे सांगितले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. त्यामुळे पक्षादेश मानून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.