उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत झालेल्या भाजपाच्या एक दिवसीय शिबिरात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. तसेच बैठकीतील सत्यता त्यांनी राज्यासमोर मांडली. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेऊन भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असं सांगितले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
“बाळासाहेबांच्या खोलीबद्दल उद्धव ठाकरे वारंवार सांगतात, त्याच खोलीमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मला त्या ठिकाणी बोलावलं. ते त्याठिकाणी बसले. मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. काही गोष्टी मनात आहेत त्या बोलायच्या आहेत. मी म्हटलं नक्की बोला. त्या खोलीत दहा- पंधरा मिनिटं बसले असतील. त्यानंतर मला बोलावलं. त्यानंतर स्पष्ट सांगण्यात आलं की, आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत. आता आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की, पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं, आम्ही काही बोलणार नाही. प्रश्नोत्तरं नको. त्यानंतर पत्रकार परिषदेत काय बोलायचं याचा सराव झाला,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“सरावावेळी आधी मराठीत बोलून दाखवलं, मग हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर रश्मी वाहिनी आल्या तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनाही बोलून दाखवा. तेव्हाही बोलून दाखवलं. अशा गोष्टी सांगायच्या नसतात. पण मला सांगायची वेळ आली आहे. आजपर्यंत बोललो नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे यांचे शब्द असे होते की, मी खूप टोकाचं बोललोय. त्यामुळे मी यू-टर्न घेतोय. आमचा फेस सेम असायला हवा, असं तुम्ही बोला. त्यामुळे अतिशय तोलामोलाच्या शब्दात बोलून पत्रकार परिषद घेतली. पुढे अनेक सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यंच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय, असा उल्लेख करण्यात आला. तेव्हा ते काहीही बोलले नाहीत. पुढे निवडणूक झाल्यानंतर नंबर गेम होऊ शकतो हे समजलं आणि त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं, असं सांगितलं,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसवर टीकेची झोड
“भाजपासोबत ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी पक्षाची दारं खुली आहेत. जे कोणी येतील, त्यांचे स्वागत आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, काँग्रेसचे विचार चालणार नाहीत. कारण, काँग्रेसचे विचार तुष्टीकरणाचे असून याच विचारामुळे देशाचे विभाजन झाले, एमआयएम, मुस्लीम लीग यांच्यासाठी पक्षाची दारे बंद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान
…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!
विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार
आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल
शिवसेना भाजपा युती भावनिक तर राष्ट्रवादीशी असलेली युती राजकीय
“विरोधक म्हणतात भाजपाने पक्ष फोडले. पण, एकनाथ शिंदे, अजित पवार हे छोटे नेते आहेत का? काल ते राजकारणात आले आहेत का? त्यांनी विचारपूर्वकचं निर्णय घेतला आहे. ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील. शिवसेना आणि भाजपची युती भावनिक असून, २५ वर्षांची मैत्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राजकीय युती आहे. मात्र, पुढच्या १० ते १५ वर्षांत त्यांच्याशी देखील भावनिक युती होईल,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.