मंगळवारी २८ डिसेंबर रोजी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. राज्याच्या राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक सत्ताधाऱ्यांकडून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात झालेल्या गोंधळात मंजूर करण्यात आले. आता यावरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार पळपुटं आणि भित्रे असल्याचा टोला लगावला आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ठाकरे सरकार हे पळपुटं आहे हे सिद्ध झाले आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचे पाप या सरकारने केले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
२०१६ सालच्या कायद्याने विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबतीत राजकारण दूर ठेवले होते. विधानमंडळातील सचिवालयही यामध्ये सामिल आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना प्र-कुलपती होण्याची काय हौस आहे कळत नाही. सरकारला आता विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप करायचा आहे. या विधेयकाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ आता सरकारच्या हातचे बाहुले बनणार आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे ही वाचा:
काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?
मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार
हे विधेयक संविधान विरोधी असून याची राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले, तसे घोटाळे होऊन उद्या डिग्री सरकारने विकायला काढल्या तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.