राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या उद्घाटन कार्यक्रमात श्रेय वादाचा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही. गेली वीस वर्षे ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याचे जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा तो महामार्ग बांधला,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“आज आनंद या गोष्टीचा आहे की, तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोक श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहेत,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. “समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले तर आनंद होईल. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण केल्यानंतर उद्घाटन केलं तर जास्त बरं होईल. कारण काम पूर्ण न करता उद्घाटन केल्यास समृद्धी महामार्गाचे महत्त्व कमी होईल,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार
गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे इस्लामिक स्टेट, सिरियाशी कनेक्शन
करौली हिंसाचारप्रकरणी ४६ जणांना अटक; कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवला
तब्बल चार तास मुलांना घेऊन शाळेची बस गायब!
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी भाजपा आणि ठाकरे सरकारमध्ये श्रेय वादाचा मुद्दा रंगला होता. आता पुन्हा एकदा भाजपाच्या काही नेत्यांकडून या मार्गाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली आहे. “समृद्धी महामार्गाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून ठाकरे सरकारने समृद्धी महामार्गाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करावे,” अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. “मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला विनंती आहे की त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.