राज्यात पोलीस बदल्यांचा महाघोटाळा झाल्याचे समोर येताच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन जबाब घेतील असे सांगण्यात आले. त्यानुसार रविवार १३ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी दोन तास चौकशी करण्यात आली.
चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, बदल्यांचा महाघोटाळा चौकशी सीबीआयकडे सोपवली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. याचा अर्थ घोटाळा झाला म्हणूनच चौकशी होत आहे. सहा महिने हा घोटाळा राज्य सरकारने दबून ठेवला. मी जर हा घोटाळा बाहेर काढला नसता तर हा कोट्यवधीचा घोटाळा दबून गेला असता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या मी सभागृहात जे विषय मांडत आहे. विरोधी पक्षाविरुद्ध षडयंत्र रचणे, दाऊदशी संबंध याबद्दल मी भाष्य करत आहे आणि म्हणूनच मला नोटीस पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे मी सांगितले पण नंतर पोलिसांनीच सांगितलं की, आम्ही तुमच्याकडे येतो. मात्र, दिलीप वळसे पाटील यांचे प्रश्न आणि आज पोलिसांनी विचारलेले प्रश्न वेगळे होते. प्रश्नांचा रोख वेगळा होता. मी गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे आजचे प्रश्न होते. मला सहआरोपी करता येईल का? अशा आशयाचे प्रश्न होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकरणाची माहिती मी गोपनीय ठेवली. मात्र, नवाब मलिक यांनी ती समोर आणली. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य सरकारला तर या घोटाळ्याची माहिती देऊ शकत नाही. ते स्वतः या घोटाळ्यात आहे मग त्यांना माहिती देऊन त्यांनी काय दिवे लावले असते, असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची माहिती केंद्रीय गृहसचिवांना दिली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे
‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर
भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती
राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी
कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. यांचे काळे कारनामे मी बाहेर काढत राहणार, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मी चौकशीला जाणार. पण पोलिसांनी, सरकारनेच विनंती केली की, आम्ही येऊ म्हणून. त्यामुळे चौकशीला संजय राऊत का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे. पत्रकार परिषदा घेऊन केंद्रीय यंत्रणांवर का आरोप करतात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.