विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा असे राजकीय युद्ध रंगलेले असताना भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत बुस्टर सभा घेतली. यावेळी भाजपा नेते आणि कार्यकर्ते सोमय्या मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. “काही लोकांना सांगायाची गरज आहे की, महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही. मराठी म्हणजे तुम्ही नाही. हिंदुत्त्व म्हणजे तुम्ही नाही. हिंदुत्त्व ही एक व्याख्या आहे. ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार करता, तुमचे साथी आणि सवंगडी जेव्हा भ्रष्टाचार करून तुरुंगात जातात तेव्हा महाराष्ट्राची बदनामी देशात होत असते,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.
“काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता की, बाबरी मशीद पाडली तेव्हा कुठल्या बिळात लपून बसले होते. तर बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचे कोणते नेते तिथे होते. त्यावेळी ३२ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यात कोणत्या शिवसेना नेत्याचे नाव आहे. तो बाबरी ढाचा.. मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला. माझा सवाल आहे, तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. मी अभिमानाने सांगतो तो ढाचा पाडला, तेव्हा मी त्याच ठिकाणी होतो. एवढेच नाही तर, त्याआधी कारसेवेमध्ये याच राम मंदिरा करता तुरुंगात मी १८ दिवस घालवले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आहे आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. आमचा त्यावेळी हा दोष होता आणि आहे की, आम्हाला अनुशासन तोडता येत नाही आणि प्रसिद्धी करता येत नाही.
“राम खरंच जन्माला आले होते का? असा सवाल ज्यांनी विचारला त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सध्या सत्तेत बसले आहात. हनुमान चालीसा पठन करायचे म्हटले की त्यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठन करायचे बोलताच त्यांच्यावर आरोपपत्र तयार केलं गेलं. हनुमान चालीसा म्हणताना राज्य उलथवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. हनुमान चालीसा म्हणून काय राज्य उलथणार?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“जम्मू आणि काश्मीरमधलं ३७० कलम हे एखाद्या काट्याप्रमाणे प्रत्येक भारतीयाला टोचत होते. ते काढण्याची ताकद कोणामध्ये होती तर त्यासाठी एकच वाघ आहे आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. काश्मीरच्या पर्यटनस्थळी आता गर्दी होऊ लागली आहे. आतंकवादाची भीती राहिलेली नाही. हे बोलतात चीनविषयी बोला. पण तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लाऊन खुर्चीत बसलात त्यांनी ५० हजार हेक्टर जमीन चीनला दान दिली. पण मोदी सरकारच्या काळात चीनला रोखलं आहे. तुम्ही जेव्हा चीनने जमीन गिळंकृत केली असं सतत बोलत असता तेव्हा तो सैनिकांचा अपमान असतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“सरकारच्या विरोधात बोलले की पत्रकारांवर, नेत्यांवर हल्ले होतात. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. प्रवीण दरेकरांनी आजच्या कार्यक्रमाची जाहिरात ‘एबीपी माझा’ला दिली तेव्हा त्यांनी ही जाहिरात सरकारविरोधी असल्याचे सांगून घेतली नाही. आज सकाळी झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील, योजनांची माहिती देतील, असं वाटलं होतं. पण नाही पुन्हा यांचं तेच टोमणे, वार, खेळ आणि बरच काही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्याचं वीज कनेक्शन तोडलं जात आहे. FDI मध्ये आमच्या सरकारच्या (फडणवीस सरकार) काळात पहिल्या क्रमांकावर होता. शरद पवार साहेब म्हणतात हनुमान चालीसा म्हटल्यावर प्रश्न सुटणार आहेत का? पण साहेब इफ्तार पार्टी करून पण प्रश्न सुटणार आहेत का?” असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना विचारला आहे. राज्यात उद्योग नसेल, गुंतवणूक नसेल तर नोकऱ्या कशा मिळणार?” असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
“कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने केवळ बिल्डर आणि बार चालकांची मदत केली. त्यांची उपासमार होत होती. या सरकारला बेवड्यांचा इतका पुळका आहे की त्यांनी इंग्रजी दारूवरचा कर कमी केला. पण सामान्यांसाठी पेट्रोल- डीझेलवरचा कर काही कमी केलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारचा बुरखा फाडला. त्यावर केवढे चिडले ते आणि जीएसटीचा विषय काढला. सामान्य माणसाकरिता हे सरकार काम करत आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“राज्यात मंत्र्यांची घोटाळे मालिका सुरू आहे. राज्याचे मंत्री तुरुंगात आहेत. मुख्यमंत्र्यांच वर्क फ्रॉम होम माहित होतं पण यांनी वर्क फ्रॉम जेलसुद्धा दाखवून दिलं आहे,” असा घाणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली. “न्यायालयाने सांगितलं वेश्यांना अनुदान द्या त्यातही यांनी घोटाळा केला,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
एप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन
फर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त
‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’
हंबीर तू, रणवीर तू…चे नितेश राणेंनी केले प्रकाशन
“मुख्यमंत्री सांगतात विरोधकांवर तुटून पडा. भाजपावर तुटून पडा. पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्यावर आलात तर तुटालही आणि पडालही,” असा खोचक इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. “मुख्यमंत्री जमलं तर तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर तुटून पडा. भाजपा आता मैदानात आहे. तुम्ही महापालिकेला इतकी वर्षे खोदून खाल्लं आहेत. पण सामान्य माणसाचा आवाज बनून आम्ही मैदानात आहोत. मुंबई ही मुंबईकरांची आहे आणि त्यांना ती परत करायची आहे. बाळासाहेबांच्या काळात वाटायचं इथे भगवं राज्य आहे पण आता तशी शिवसेना राहिलेली नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “मुंबईच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गोष्ट आहे. पण आता यांचे पोपट बोलतील की, बघा तुम्हाला बोललो होतो ना हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत. पण कोणामध्ये हिंमत नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे १४ मे नंतर पोलखोल सभा घेणार असल्याचे त्यांनी या सभेदरम्यान सांगीतले. त्यामुळे आता १४ मे नंतर महापलिकेच्या कोणत्या घोटाळ्याची पोल खोल होणार याकडे लक्ष असणार आहे.