एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, ८ एप्रिल रोजी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक केली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला असून त्यांनी पोलीस यंत्रणांचे अपयश असल्याचे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात असे नेत्यांच्या घरावर हल्ले होणं योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे मुद्दे मांडले जावेत आणि सरकारने त्या मुद्द्यांची नोंद घ्यावी,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“या प्रकरणानंतर काही माध्यमांच्या लोकांकडून समजलं की त्यांना साधारण अडीच वाजताच या प्रकरणासंदर्भात मेसेज आले होते. अशावेळी राज्यातील पोलीस काय करत होते. याप्रकरणी पोलीस कारभाराची चौकशी व्हावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान पदाची खुर्ची जाण्याची चिन्ह दिसताच इम्रान खान यांची भारतावर स्तुतिसुमने
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
थप्पड प्रकरणामुळे स्मिथला १० वर्षे ऑस्कर सोहळ्यात उपस्थित राहता येणार नाही
“काल घडलेल्या घटनेचं दृश्य हे भयावह होतं. इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर पूर्वनियोजित हल्ला केला जातो. कॅमेरे पोहचू शकतात मग पोलीस का पोहचू शकले नाहीत. कालचा हल्ला हा पोलीस इंटेलिजन्सचे मोठे अपयश आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कालही या संपूर्ण घटनेचा आणि हल्ल्याचा निषेध केला. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो असे फडणवीस यांनी म्हटले होते.