“विरोधकांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे”

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

“विरोधकांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे”

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना ‘इंडिया’ आघाडीवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने निघून जायचे. असे इंजिन काय कामाचे आहे? आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी केवळ इंजिन आहे. यांना एकही डबा नाही. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची ही जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे त्यामुळे हे जनतेच्या कामाचे नाही,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आघाडीला लगावला आहे.

“महायुतीत तीन पक्ष सोबत आहेत त्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकसभेच्या ३३ जागा भाजपा लढणार असा कधीही दावा केला नव्हता. प्रयत्न आहे की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा लढल्या पाहिजे आणि तशा जागा आम्हाला मिळाल्या आहेत. जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे,” अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील जागा वाटपावर भाष्य केले.

हे ही वाचा.. 

पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!

प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

दरम्यान, त्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी महायुती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version