‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात भाजप आक्रमक झाले आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मत मांडले आहे. सोमवारी १७ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस पक्षाला लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारे संघटन म्हणायचे? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते, असा टोला देवेंद्र फडणवीस पटोले यांना लगावला होता. यावरूनच आज फडणवीस यांनी म्हटले की, शारीरिक उंची वाढली म्हणजे बौद्धिक उंची वाढते असे नसते, हे नाना पटोले यांनी दाखवून दिले आहे. सरकारमधील एखाद्या नेत्याच्या मनातील हे असे विचार म्हणजे लोकशाहीला घातक आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वक्तव्य करूनही पटोले यांच्यावर अजूनही एफआयआर दाखल करण्यात आले नाही. मात्र, राबरी देवी यांच्याबद्दल वक्तव्य केल्यावर एका कार्यकर्त्याची रातोरात चौकशी करण्यात आली होती. कार्यकर्त्याने केलेल्या वक्तव्यावर समर्थन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांचे सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलिसांचे काम असेच सुरू राहिले तर राज्याची अधोगतीच होणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गावातल्या मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोलत असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यांच्या गावात कोणीही मोदी नावाचा गावगुंड सापडणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री यांनी कारवाई करायला हवी. मात्र, तसे होताना दिसत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

गोवा विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली. मनोहर पर्रीकर यांच्याबाबतीत संजय राऊत हे मगरीचे अश्रू गाळत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. संजय राऊत यांना नटसम्राटमध्ये भूमिका द्या. सकाळी एक बोलायचे आणि संध्याकाळी एक बोलायचे असे त्यांचे असते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. उद्या बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर गोव्यातील उमेदवारांची यादी तयार करून घोषणा केली जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Exit mobile version