“मविआ काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिलेली”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

“मविआ काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिलेली”

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं तेव्हा परमबीर सिंह यांनी लावलेले आरोप सत्य असल्याची पुष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच त्यांनी फक्त एकच घटना सांगितली आहे. मात्र, अटक करण्याचा प्रयत्न एकदा झाला नसून चार वेळा झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

माझ्यासह काही नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली गेली होती, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, “आम्ही मविआ सरकारचं हे कट-कारस्थान उघड करण्यात यशस्वी ठरलो होतो. यासंदर्भातील व्हिडिओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले होते. आजही आमच्याकडं यासंदर्भातील अनेक व्हिडिओ पुरावे आहेत,” असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि माझ्यासारख्या भाजपच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांचा डाव होता. काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील सुपारी घेतली पण ते हे करु शकले नाहीत कारण इतर असे अनेक अधिकारी होते ज्यांनी अशा प्रकारे खोट्या केसेस आमच्यावर दाखल करण्यास नकार दिला, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

हे ही वाचा..

आंदोलकांच्या दबावानंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

संजय राऊत हे पवारांची सोंगटी

भारतात आश्रय मिळविण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर हिंदू पाण्यात उभे

बांगलादेशी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपा नेत्यांबद्दल एक मोठं विधान केलं. सध्या त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी सिल्व्हर ओकवर स्वतः शरद पवारांनी बैठक बोलावली होती. तसेच याबद्दल मातोश्रीवरही बैठक पार पडली, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी केला होता.

Exit mobile version