काल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस पुण्याला आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीची तयारी सुरु झाली असून ज्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन करू त्या दिवशी आम्हाला एवढी छोटी जागा पुरणार नाही. पुणे महापालिकेत जास्त संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
भाषणात बोलताना फडणवीस म्हणाले की, मला प्रश्न विचारला हे शक्तीप्रदर्शन आहे का? मी सांगितले हे कार्यकर्ते उत्साहाने आले आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करायचे ठरवले तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा असा विशेष उल्लेख करून सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशा लोकांसोबत आहेत जे रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
लोकसभेच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले त्यात शिवसेनेचे दोन खासदार होते. जेव्हा त्यांना संसदेची माफी मागण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? असे विचारले. यावर फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधून म्हटले की, अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या नखाची सरही तुम्हाला येऊ शकत नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत हे आम्ही ठणकावून सांगणार, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आम्हाला अभिमान आहे आम्ही अशा पक्षाचे नेतृत्व करतो ज्याचे नेते नरेंद्र मोदी आहेत, असेही फडणवीस म्हणाले. एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. भारत आज सर्व बाजूंनी प्रगती करत आहे.
मेट्रो, नदीसुधार,पाण्याच्या योजना आणि 25वर्षांच्या नियोजनाची मुहूर्तमेढ!
पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे.
कारण भाजपाने केलेला विकास पुणेकरांनी पाहिला आहे.पुणेकर विकासासोबतच राहतील.
भाजपा कार्यालय उदघाटनप्रसंगी माझे मनोगत https://t.co/Zmz79XPa9s #Pune #BJP @BJP4PuneCity— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 3, 2021
मोदींच्या नेतृत्वात लस तयार झाली नसती तर काय झालं असतं. अमेरिका, रशिया सारख्या देशांनी सांगितले असते की आमचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लस देणार नाही. मात्र, सिरम असेल की भारत बायोटेक, यांना सोबत घेऊन, मदत करुन, त्यांना पैसे देऊन भारतात लस तयार केली गेली. १०० कोटी भारतीयांना मोदींनी लस मोफत दिली.
महाराष्ट्र सरकारचे दोन वर्षे पूर्ण झाले तेव्हा सरकार सांगत होते की आम्ही दहा कोटी लसी दिल्या या लसी जमिनीतून पैदा झाल्या की आकाशातून टपकल्या. मोदींनी तुम्हाला लस दिली म्हणून तुम्ही दहा कोटी लसीकरण करु शकला, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या
‘वाघ’च म्हणतो बंद करा मांसाहार!
उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी
भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक परस्परांना भिडले
मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती होतेय मात्र, महाराष्ट्रात चित्र वेगळच आहे. इथे वसूली हा एकच धंदा आहे. इथली नोकरी संपुष्टात येतेय. नेत्यांनी राजकीय स्वार्थासाठी नोकरशाही संपुष्टात आणली. नेतेच वसुली करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला. सामन्य माणसाचा विचार सरकारला करायचा नाही. पुण्यात आमच्या महापालिकेनं रस्त्यावर येऊन काम केलं. सामान्यांसाठी आमची महापालिका जागत होती. राज्य सरकारने काय केले? एक पैशाचेही अनुदान राज्य सरकारने दिले नाही. कोरोना काळात महापौर सेवा करायला रस्त्यावर होते. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केले. भाजप हे सेवेच संघटन आहे, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुणेकरांच्या मनात भाजप आहे. वर्षानुवर्षे ही पालिका काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. इथे भ्रष्टाचाराचा अड्डा होता. मेट्रो असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल. देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे जायला जनता तयार नाही. पुण्यात शिवसेना आता नावालाही उरलेली नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.