मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. या मुद्द्याचे पडसाद विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दिसून आले. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाबाबत मी काय केलंय हे माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन उच्च न्यायालयात टिकवले यानंतर मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही टिकवले. काही योजना सुरू केल्या,” त्यामुळे याचे वेगळे प्रमाणपत्र आवश्यक नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही माझ्याबद्दल बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नाही, माझ्यामागे उभा राहिला आहे. दु:ख या गोष्टीचं आहे की अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते. पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आई- बहिणी काढायच्या? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाहीये. यामागे कोण आहे हे शोधावंच लागेल”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना दिली.
दरम्यान, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केल्यानंतर त्यावरूनही फडणवीसांनी टीका केली. “दगडफेक करणारे सांगत आहेत की त्यांना दगडफेक करायला कुणी सांगितलं! पोलिसांचा लाठीचार्ज महत्त्वाचा आहेच. पण तो का झाला? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे. कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगेंना परत आणणारे कोण आहेत? त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणाकडे बैठक झाली ते आरोपीच सांगत आहेत. दगडफेक करा असं सांगितल्याचं आरोपीच सांगत आहेत. पोलीस आपले नाहीयेत का?” असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केले.
“दुर्दैवाने बीडची घटना विसरत आहोत. हे आंदोलन शांततेनं झालेलं नाही. मराठा समाजानं काढलेले मोर्चे शांततेतच झाले होते. पण यावेळी शांतता नव्हती. त्यांचे फोटो कुणासोबत निघतायत? कोण त्यांच्यासोबत होते? हे सगळं बाहेर येतं आहे. अशाप्रकारे कुणी कुणीची आई- बहीण काढणार असेल, तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की त्यांनी संबंधित सदस्याच्या पाठिशी उभं राहायला हवं. मग ते विरोधी पक्षाचे असो किंवा सत्ताधारी. विरोधकांच्या बाबतीत असं घडलं तरी हा देवेंद्र फडणवीस त्यांच्यामागे ताकदीनं उभा राहील,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
“मराठा समाजाचे आरक्षण घालवायलाही आणि आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार”
तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…
आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले
ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड
“मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणं- घेणं नाही. त्यांच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे ते समोर आलं पाहिजे. काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात. तीच स्क्रिप्ट त्यांच्याकडून येत आहे. वॉररूम कुणी कुठे उघडली याची माहिती आहे. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.