पालघर जिल्ह्यातील पायरवाडी येथे रुग्णवाहिका नसल्याने पित्याला सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ही घटना अतिशय लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, विशिष्ट कंपन्यांना मदतीसाठी सुपर मार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पालघर जिल्ह्यात गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडले ते पहा. रुग्णवाहिका नसल्याने दुर्दैवी पित्याला सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागला, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
अतिशय लज्जास्पद!
विशिष्ट कंपन्यांना मदतीसाठी सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे. पालघर जिल्ह्यात गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडले पहा.
रुग्णवाहिका नसल्याने दुर्दैवी पित्याला 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागला.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2022
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका चिमुकल्याचा तापाने मृत्यू होतो, नि पैसे नाहीत तर मृतदेह पायी घेऊन जा असे सांगत हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स नाकारली जाते. ही निर्दयता दाखवलीय शासकीय जव्हार कुटीर रुग्णालयाने. या प्रकरणात दोन ॲम्ब्युलन्स चालकांचे निलंबन झाले आहे. पण हॉस्पिटलवरही कारवाई करा तरच अशी दांभिकता थांबेल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
पालघर: एका चिमुकल्याचा तापानं मृत्यू होतो नि पैसे नाहीत तर मृतदेह पायी घेऊन जा असं सांगत हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स नाकारली जाते
ही निर्दयता दाखवलीय शासकीय जव्हार कुटीर रुग्णालयानं
या प्रकरणात २ ॲम्ब्युलन्स चालकांचं निलंबन झालंय पण हॉस्पिटलवरही कारवाई करा तरच अशी दांभिकता थांबेल. pic.twitter.com/1iNHC6tIEg
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 29, 2022
पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी या सहा वर्षीय मुलाला ताप आला होता. यानंतर आई- वडिलांनी उपचारासाठी त्याला त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात दाखल केले. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉ जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान २५ तारखेला रात्री ९ वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात
नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला आगीने वेढले
… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र
शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप
मृतदेह घरी नेण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता पैस देणार असाल तरच गाडी मिळेल, असे उद्धट उत्तर देण्यात आले. पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही त्यांना यावेळी सांगण्यात आल्याचे चिमुकल्याच्या वडिलांनी सांगितले. मात्र, पैसे नसल्याने थंडीत कुडकुडत ते ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.