केंद्र सरकारने इंधानावरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील इंधन दर कमी करण्याचा निर्णय अखेर रविवार, २२ मे रोजी घेतला. त्यानुसार पेट्रोल २ रुपये ६ पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल १ रूपया ४४ पैशाने स्वस्त होणार आहे. मात्र, राज्य सरकारने इतका कमी रुपयांनी इंधनावरचा दर कमी केल्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सणसणीत टीका केली आहे.
तसेच “अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते!” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते!#PetrolDieselPrice
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2022
हे ही वाचा:
फोटो काढला दुसऱ्याने; बळी मात्र लिलावतीचे सुरक्षा अधिकारी पराग जोशींचा
पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक
हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!
राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती
केंद्र सरकारने शनिवार, २२ मे रोजी पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी केलं त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य सरकारांना देखील करात कपात करण्याचे सांगितले होते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांना राज्य सरकार कडून अपेक्षा होत्या. राज्य सरकारवर इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक स्तरांवरून दबाव देखील येत होता. त्यानंतर अखेर काल महाराष्ट्र राज्य सरकारने इंधन दर कमी केले.