स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं एका कार्यक्रमात सादर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला असून दुसरीकडे शिवसेना नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी केली जात असून कार्यक्रम झाला त्या स्टुडीओचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली आहे. शिवाय या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत.
कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही म्हणणे नसून ते स्वैराचाराकडे जाणारे नसावे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण ते स्वैराचाराकडे जाणारं असेल, तर ते मान्य होणारं नाही,” असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
“कुणाल कामरा याचा इतिहास पाहिला तर देशातील उच्चपदस्थ लोक म्हणजे पंतप्रधान, न्यायव्यवस्था अशांवर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कामराची कार्यपद्धती असल्याचे दिसून येते. मुळात या व्यक्तीला एक प्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. अशा हव्यासातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्याने प्रयत्न केला. खरंतर या कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीतून जनतेनंच हे ठरवून दिलं की कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का?” असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आश्चर्य वाटतं की राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावर जाऊन कुणीतरी बोलतो आणि समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ बोलायला उभे राहतात. हे काय कामराशी ठरवून चाललंय की कामराला सुपारी दिली आहे? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हेही वाचा..
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूरीसाठी सार होणार
जनतेने कोण गद्दार आणि कोण खुद्दार दाखवून दिले, कामराने माफी मागावी!
तेजस्वी यादवांच्या मार्गातील मोठा अडथळा लालू यादवच
राहुल गांधी लाल संविधान घेऊन फिरतात त्या पुस्तकासोबत त्याने फोटो टाकला आहे. संविधान वाचले असते तर असा स्वैराचार केला नसता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी माझ्यावर, शिंदेंवर कविता करावी, राजकीय व्यंग करावं. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण सुपारी घेऊन जर कुणी अपमानित करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे म्हणत छाती बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतो, या गोष्टी महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही, असा कठोर इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.