नवी मुंबईतील एका कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला अस वाटतच नाही की, मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही.’ असे विधान केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप करण्यात आले तेव्हा कार्यक्रमामध्ये बोलताना असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
‘मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही; तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिले नाही की, आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे,’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatre https://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
फडणवीसांच्या या विधानामुळे सत्ताधारी पक्षाला पोटदुखी झाली आणि त्यांनीही त्यांच्या या विधानाला प्रतिउत्तर दिले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेते पदही तितकंच मोठं आहे,’ असे वक्तव्य केले.
हे ही वाचा:
‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालये सुरू करण्यावरून केला खेळखंडोबा’
लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!
… म्हणून ऐरोली खाडीतले मासे मृत पावले!
‘साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे’
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘चांगली गोष्ट आहे. याचा आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.