“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

महायुतीच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत आलेल्या कलानुसार दिसून येत आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही मतदारांचे आभार मानले आहेत. विजयानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला आमचे साष्टांग दडंवत. त्यापेक्षा अधिक काही बोलता येत नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे. एक है तो सेफ है हा मोदींनी दिलेला नारा महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन यशस्वी केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले, त्यांचेही आभार मानतो. लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. गावागावात सगळीकडे जाऊन हा अलख जगवला हा विजय त्यांचा आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. विशेषतः राज्यात महाविकास आघाडीने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस यानी अमित शाह आणि लाडक्या बहि‍णींचे विशेष आभार मानले. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं आहे. राज्यात जो विषारी प्रचार करण्यात येत होता, त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं कृतीतून उत्तर दिलं आहे. एकी दाखवली आहे. जनतेचे मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, अखेर हा चक्रव्यूह तोडून दाखवला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाय फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही वादविवाद नाही, तीनही पक्षांचे नेते बसून, बोलून, विचार विनिमय करून जो निर्णय घेतील ते मान्य असेल.

हे ही वाचा : 

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

“विधानसभेतील विजयात माझा सहभाग खूप लहान आहे. टीमचे मोठे काम आहे. फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केले नाही. तर, संपूर्ण २८८ जागांवर भाजपने काम केले. राज्यात आता विरोधी पक्षनेता नसेल पण विरोधी पक्षाचे जे लोक निवडून आले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, जिंकले तर जनमताचा कौल आणि पराभूत झाला तर ईव्हीएममध्ये गोंधळ ही त्यांची नेहमीची कारणे आहे. परंतु त्याऐवजी त्यांनी आता आत्मचिंतन करायला हवे आणि खरी कारणे काय याचा विचार करायला हवा.

Exit mobile version