एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली वर्षावर भेट

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार

महायुतीच्या सरकारच्या शपथविधीला आता केवळ एक दिवस शिल्लक असताना भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे गेले काही दिवस आजारी होते. त्यामुळे ते आपल्या गावी गेलेले होते. मुंबईत परतल्यावर वर्षा या सरकारी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे आता भाजपा आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे इंडिया टुडेने म्हटले आहे.

निवडणूक निकालांनंतर प्रथमच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अशी भेट झाली आहे. सरकार कसे बनणार याविषयी रोज नवनव्या चर्चा सुरू असताना आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्यांना ऊत आलेला असताना ही भेट झाल्यामुळे सगळ्या बातम्यांमधील हवा निघून गेली आहे.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ही जबाबदारी स्वीकारण्यास एकनाथ शिंदे यांनी तयारी दर्शविल्याचे समोर येते आहे. विशेष म्हणजे त्याआधी सत्तेचे वाटप कसे होईल, यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. फडणवीस यांनी भेट घेण्यापूर्वी संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते.

हे ही वाचा:

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

हे आंदोलन की, भाजपाला मारलेली शिट्टी?

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेण्यास सज्ज असल्याचे सगळे संकेत मिळत आहेत. ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आदिंच्या उपस्थितीत हा सोहळा आझाद मैदानावर होईल. मंगळवारी महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आझाद मैदान येथे सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे महायुतीत कोणताही दुरावा नाही, हे स्पष्ट झाले.

महायुतीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना जवळपास २१-२२ मंत्रिपदे मिळतील अशी शक्यता आहे तर त्याखालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे यांनी १६ मंत्रिपदांची मागणी केलेली असताना १२ मंत्रिपदे त्यांना मिळतील असे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या पक्षाला ९ ते १० मंत्रिपदे मिळतील. त्यात अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रीपद असेल.

मंगळवारी एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची नियमित तपासणी झाली. घशाला त्रास होत असल्यामुळे आणि ताप असल्यामुळे शिंदे रुग्णालयात गेले होते. त्यानंतर ते वर्षावर दाखल झाले. तिथे त्यांची भेट गिरीश महाजन यांनी घेतली. दरम्यान, बुधवारी भाजपाचा गटनेता निश्चित होणार असून त्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचे कळते.

Exit mobile version