आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात काय होणार, महायुतीचे काय होईल, असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आणि मुख्यमंत्रीपदासाठी आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही, हेदेखील स्पष्ट केले. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी आपली ही मते स्पष्टपणे व्यक्त केली.
ते म्हणाले की, काही लोकांना वाटते आहे की, महाराष्ट्र पेटला आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. मला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आम्हालाच साथ देईल. आमचा तिघांचा प्रयत्न आहे की, लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर व्हायला वेळ लागला पण यावेळी तसे होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. ते म्हणाले की, लोकसभेत आम्ही अतिआत्मविश्वास बाळगून होतो. निवडून येऊ असा विश्वास होता त्यामुळे आवश्यक त्या क्षमतेप्रमाणे काम केले नाही. पण आता कार्यकर्त्यांत उत्साह आहे. अजित पवार आमच्यासोबत आले तेव्हा कार्यकर्त्यांत संभ्रम होता. यांच्याविरोधात लढलो आता त्यांच्यासाठी मते कशी मागायची, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात होता. पण आता ती स्थिती नाही. महाराष्ट्रात छोटे पक्ष तयार झालेत. पूर्वी ४ होते आता ६ झालेत. १९९५ नंतर महाराष्ट्रात आघाडीचेच राजकारण झालेले आहे. पण, महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजपा राहिला आहे.
ही इतक्या पक्षांची खिचडी आहे का, यावर ते म्हणाले की, ही खिचडी नाही. कुणीही बाहेर जाणार नाही. आम्हीच नवे सरकार तयार करू. मुख्यमंत्री पदावरून कोणताही तणाव नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेऊ.
मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले की, आमच्या सरकारने १० टक्के आरक्षण दिले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची मागणी आहे की, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या. यावरून मला सातत्याने लक्ष करण्यात येते. माझी थट्टा उडविण्याचा प्रयत्न होतो. मी थेट प्रश्न विचारतो. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेसने हिंमत असेल तर याबाबत आपली भूमिका व्यक्त करावी. मराठा समाजाला ओबीसीत घ्यावी अशी जरांगेंची जी मागणी आहे, त्यावर आपली भूमिका मांडावी. मला हे माहीत आहे की, ते आपली भूमिका व्यक्तच करू शकत नाहीत. मराठा समाजाला आता हे हळूहळू समजायला लागले आहे. याला निवडणुकीचा मुद्दा मानला तरी मराठा समाज आमच्यासोबत राहील.
मी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केले. त्याअंतर्गत १ लाख मराठा उद्योगी तयार केले. ते आता लोकांना नोकरी देतात. आता ज्या प्रकारे जरांगे पाटील यांच्या मागे लपून विरोधक बाण चालवू पाहात आहेत, ते फार काळ चालणार नाही. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची मला कीव येते. एकेकाळी मातोश्रीवर बाळासाहेब बसत असत आणि लोक त्यांना येऊन भेटत. उद्धव यांना मात्र सोनिया गांधीची वेळ मागावी लागते. त्याचा फोटोही काढला जात नाही. आम्ही दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला जातो. सगळेच त्यांना भेटायला जातात. पण लाचारी म्हणून जेव्हा तुम्ही सोनियांकडे जातात आणि मुख्यमंत्री करा म्हणता तेव्हा लाचारी कोण करते हे लोकांना कळते.
हे ही वाचा:
सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज
बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यास नकार
गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी
आपल्यावर विरोधकांकडून वैयक्तिक हल्ले केले जातात, यावर फडणवीसांनी स्पष्ट केले की, वैयक्तिक हल्ले झाले तरी मला त्याची सवय आहे. आम्ही महादेवांना मानतो. तेव्हा विष जरी प्यावे लागले तरी आमची पिण्याची तयारी आहे. तुम्ही पाहाल. हे फक्त गरजतात, बरसत नाहीत. तुम्ही दिल्लीला जाणार अशी चर्चा आहे. यावर फडणवीस म्हणाले की, अशा चर्चा सुरू असतात. बातम्या नसल्या की, अशा बातम्या दिल्या जातात. माझ्या पक्षाला मी ओळखतो, माझी पक्षाला महाराष्ट्रात काय गरज आहे, तेव्हा मी महाराष्ट्रात राहणार. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पूर्ण करीन. जे रामसेवक असतात ते राष्ट्रसेवक असतातच. महाराष्ट्राची सेवा करण्याची जबाबदारी मिळाली आहे ती पूर्ण करीन.
लाडकी बहीण योजना आपण सुरू केलीत, त्यावरून विरोधक लक्ष्य करत आहेत. त्यावर फडणवीसांनी सांगितले की, जेव्हा राहुल गांधी म्हणतात खटाखट खटाखट तेव्हा काही वाटत नाही. पण आम्ही या योजनेबाबत १ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेत. आणखी ५० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करू. अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जातील. या यशस्वी योजनेमुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. ते न्यायालयात गेले आहेत. त्यांनी कितीही असा विरोध केला तरी पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही महिलांना केंद्रस्थानी आणणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होणार नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, १५०० रुपयात मते खरेदी केली जातात. त्यावर फडणवीस म्हणाले की, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना याची किंमत काय कळणार. त्यांच्यासाठी तर ही रक्कम म्हणजे हॉटेलात टीप देण्याची रक्कम आहे. पण महिलांना महिनाअखेरीस पैशांची गरज असते तेव्हा त्यांना याच पैशाचा उपयोग होतो. मी विरोधी पक्षांना सांगतो आहे की, याप्रकारे महिलांच्या प्रेमाला कुणी खरेदी करू शकतो का, कितीही पैसे दिले तरी हे प्रेम विकत घेता येणार नाही.