नुकतेच पार पडलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन हे चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. ज्या संसदेला लोकशाहीचे मंदिर मानले जाते त्याच आपल्या संसदेत लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटना पाहायला मिळाल्या. अधिवशेन संपायला अवघे काही तास शिल्लक असतानाच विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातलेला पाहायला मिळाला.
कागदपत्र फाडली गेली, मंत्र्यांचे रस्ते अडवले गेले, इतकेच नाही तर एलईडी टीव्हीच्या स्टॅण्डवर चढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. विरोधकांनी हुल्लडबाजी करत घातलेल्या या राड्यामुळे परिस्थिती इतकी चिघळली की सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. पण असे होऊनही हा गोंधळ काही थांबला नाही. उलट काही खासदारांनी या सुरक्षारक्षकांनाच धक्काबुक्की केलेली पाहायला मिळाली.
या संपूर्ण प्रकरणाचे एक विस्तृत व्हिडीओ फुटेज राज्यसभेतर्फे प्रसारित करण्यात आले आहे. एकूण ६३ मिनिटांचे हे व्हिडीओ फुटेज आहे. तर त्यासोबतच या प्रकरणाचा एक अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. हा अहवाल राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची नावे आणि कृत्ये स्पष्टपणे नमूद केली आहेत.
या अहवालानुसार सर्व घडामोडींची सुरुवात ही बुधवार, ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०२ वाजता झाली. जेव्हा राज्यसभेत विम्या संदर्भातील एक विधेयक पटलावर ठेवले जात होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार डोला सेन यांनी त्यांचा स्कार्फ काढून फास तयार करत त्यांच्याच पक्षाच्या सहयोगी खासदार शांता छेत्री यांच्या गळ्याभोवती अडकवला आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर विरोधी पक्षाचे खासदार हे वेलच्या दिशेने सरसावले. काँग्रेसच्या सदस्या फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी कागदपत्र फाडून सभागृहाच्या व्यासपीठासमोर भिरकवायला सुरवात केली.
अंदाजे ६.१० वाजता कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनोय विस्वाम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एलामराम करीम यांनी टेबलवर ठेवलेले कागदपत्र आणि फोल्डर हिसकावून घेतले. त्यानंतर काँग्रेसचे राजमणी पटेल आणि शिवसेनेचे अनिल देसाई हे सुद्धा त्यांच्या साथीला उभे ठाकले.
हे ही वाचा:
चला, जुन्या गाड्या लवकर भंगारात काढा!
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
पुढे ६.२२ मिनिटे झाली असताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हे दोघे अध्यक्षांच्या चेंबरमधून सभागृहात दाखल होत असतानाच तृणमूल खासदार डोला सेन यांनी त्यांचा रस्ता अडवला. तसेच त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली असे या अहवालात म्हटले आहे. तर खासदार डोला सेन यांनी एका महिला सुरक्षा अधिकाऱ्या सोबत सुद्धा हुज्जत घालून तिला धक्काबुक्की केल्याचे व्हिडीओ फुटेजमहसून समोर आले आहे.
नंतर विरोधी पक्षाचे खासदार सय्यद नासिर हुसेन, अर्पिता घोष आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सचिवालयाच्या टेबल वरचे पेपर फाडून भिरकवायला सुरवात केली. पुढे साडे सहाच्या सुमारास काँग्रेस खासदार सय्यद नासिर हुसेन यांनी पहिल्यांदा शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुरक्षा रक्षकांवर ढकलले आणि नंतर त्यांना मागे खेचून घेतले. त्यानंतर पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एलामराम करीम, काँग्रेसचे रीपून बोरा आणि अखिलेश प्रसाद सिंग, तसेच कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनोय विस्वाम हे देखील या धक्काबुक्कीत सहभागी झाले.
काँग्रेस खासदार रीपून बोरा यांनी राज्यसभेतील व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असलेल्या एलईडी टीव्ही स्टँडवर चढायला सुरुवात केली. तर एलामराम करीम यांनी वेलमधील सुरक्षा कवच भेदण्यासाठी एका सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली आणि गळा पकडत त्याला खेचले. खासदार फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी देखील एका महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करत खेचले. तर सय्यद नासिर हुसेन आणि एलामराम करीम यांनी आणखीन एका पुरुष सुरक्षारक्षकाला खांद्याला धरून खेचत सुरक्षाकवच भेदण्याचा प्रयत्न केला. तो एका महिला सुरक्षा रक्षकाचा बचाव करत होता.
या सर्व प्रकरणावरून देशभरातून विरोधी पक्षाच्या या बेजबाबदार वर्तनासाठी त्यांच्यावर टीका आहोत आहे. तर दुसरीकडे सगळ्या गोष्टी व्हिडीओ फुटेज आणि अहवालातून समोर येत असल्या तरीही विरोधक मात्र त्यांची चूक मान्य करायला तयार नाहीयेत.