माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे यांनी ७ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या जबाबानुसार राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आणि पोस्टिंगसाठी यादी देत असत. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सीताराम कुंटे यांनी असे सांगितले आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी सुरू असलेले अनिल देशमुख हे कधीकधी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांची अनधिकृत यादी सुपूर्द करत असत. ज्या नावांना अंतिम बदली आणि पोस्टिंग ऑर्डरमध्ये समाविष्ट केले जात असे.
अनिल देशमुख हे त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांच्याकडे हे याद्या सोपवायचे. मी अनिल देशमुख यांच्या अधिन काम करत असल्याने याद्या नाकारू शकत नव्हतो, असा खुलासा सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर केला आहे.
बदली आणि पोस्टिंगसाठी राज्यात कोणत्या प्रक्रियेचा अवलंब केला जातो याचे स्पष्टीकरण देताना कुंटे यांनी ईडीला सांगितले की, देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत यादी पोलिस आस्थापना मंडळाच्या (पीईबी) सर्व सदस्यांना नेहमीच दाखवली जात असे आणि ते याबद्दल सदस्यांना तोंडी माहिती देत असत. तसेच देशमुख यांनी पाठवले आहे, असे सांगितले जात असे. ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीत कुंटे यांचे विधान समाविष्ट केले आहे.
देशमुख आणि राजकीय पक्षातील कॅबिनेट मंत्री बदल्या आणि पोस्टिंगची अनधिकृत यादी तयार करत होते, असे ईडीने म्हटले आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत कॅबिनेट मंत्र्याचे नाव घेतलेले नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार, ‘पीईबी’ची कार्यवाही ही एक औपचारिकता होती, जिथे सदस्यांनी विरोध करूनही शिफारशी मान्य केल्या आणि त्यावर स्वाक्षरी केल्या ज्या पुढे सक्षम प्राधिकरणाकडे म्हणजेच गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या जात असत.
हे ही वाचा:
नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार
स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’
ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय
अनिल देशमुख यांनी कथितरित्या तयार केलेल्या अशाच एका यादीची ईडी चौकशी करत असून ज्यामध्ये महाराष्ट्रभर नियुक्त केलेल्या १२ पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकार्यांचे जबाब नोंदवले आहेत परंतु हे सध्याच्या फिर्यादी तक्रारीचा भाग नाही.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानुसार, मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. ईडीने त्यांना २ नोव्हेंबर रोजी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.