स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अशा अवमानजनक टिप्पणींना न्यायालय परवानगी देणार नाही आणि पुनरावृत्ती झाल्यास न्यायालय स्वतःहून कारवाई करेल, असा कठोर इशारा राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरुद्धचे समन्स रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राहुल गांधींच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, या विधानाद्वारे शत्रुत्व भडकवण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, खंडपीठाने गंभीर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “तुमच्या अशिलाला महात्मा गांधींनी ‘तुमचा विश्वासू सेवक’ (your faithful servant) हे शब्द वापरले होते हे माहित आहे का? त्यांना माहित आहे का की, त्यांच्या आजीनेही स्वातंत्र्यसैनिकांना पत्र पाठवले होते?” असे सवाल विचारले. न्यायालयाने राहुल गांधी यांना अशा प्रकारच्या टिप्पण्या करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की, “तुम्ही एक राजकीय नेते आहात. तुम्ही अशा टिप्पण्या का कराव्यात? असे करू नका. जर चिथावणी देण्याचा हेतू नव्हता, तर अशी विधाने का करता?”
सर्वोच्च न्यायालयाने सध्या या कारवाईला स्थगिती देण्यास सहमती दर्शवली आहे, पण राहुल गांधींनी अशा प्रकारच्या वक्तव्यांची पुनरावृत्ती करू नये असे स्पष्ट म्हटले आहे. अशी विधाने पुन्हा केल्यास न्यायालय स्वतः दखल घेऊन कारवाई करेल. आमच्या स्वातंत्र्यसैनिकांवर कोणालाही भाष्य करू देणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
हे ही वाचा:
प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक
दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर
राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका रॅलीदरम्यान वीर सावरकरांवर वादग्रस्त विधान केले होते. त्या टिप्पणीवरून हा मानहानीचा खटला सुरू झाला. गांधीजींनी सावरकरांचा उल्लेख ‘ब्रिटिश नोकर’ असा केला होता ज्यांना वसाहतवादी सरकारकडून पेन्शन मिळत असे. गांधी यांनी रॅलीदरम्यान सावरकरांचा जाणूनबुजून अपमान केल्याचा आरोप करत वकील नृपेंद्र पांडे यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने आरोप केला आहे की गांधीजींचे वक्तव्य सावरकरांना बदनाम करण्याच्या सुनियोजित कटाचा भाग होते.