ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी

कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी कारवाई

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी मालेगाव न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयात त्यांना हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. रेणुका सहकारी सूत गिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अद्वय हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी भोपाळ येथून अटक केली. रात्री उशिरा त्यांना मालेगाव येथे आणण्यात आले होते.

पोलीस ठाण्याच्या आणि न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. अद्वय हिरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी न्यायालयात इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली.

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्यावर ही रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!

शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.

Exit mobile version