विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. यावेळी अधिवेशनात नार्वेकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच इतर नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
अधिवेशनात फडणवीसांनी नार्वेकरांचे कौतुक करताना म्हणाले, राहुल नार्वेकरांचे कुटुंब हे सावंतवाडीचे आहेत. गोव्यातही त्यांचे वास्तव्य होते, अनेक वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत. वडिलांचा समाजकारणाचा वारसा नार्वेकरांना मिळाला आहे. पंधरा वर्ष त्यांनी वकिली केली. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं योगदान आपण आता देणार आहात, यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल. दोन्ही बाजूंना न्याय देत उत्तम प्रकारचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम कराल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राहुल नार्वेकर देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. या आधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांचही फडणवीसांनी अभिनंदन केले आहे.
हे ही वाचा:
शिवसेना चित्रपट सेनेला खिंडार; उपाध्यक्ष दिगंबर नाईक भाजपच्या वाटेवर?
सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो
राहुल नार्वेकरांच्या पाठीशी राजकारणाचा वारसा
‘पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार’
यावेळी मिश्किलपणे असेही फडणवीसांनी म्हटले, आज हाही योगायोगही असेल की, विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात सभापती रामराजे निंबाळकर आणि कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जणु सासरे-जावाई आहेत. पुलं देशपांडे म्हणायचे, जावाई-सासऱ्याचे एकमत होणं कठीण आहे. तर जावायचा उल्लेख पुलं देशपांडे जावाई हा सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह असा करतात,पण त्यांचे प्रेम आहे सासऱ्यांवर, काळजी करू नका, असे ते म्हणाले. त्यांनतर फडणवीसांच्या या मिश्किल टिप्पणीवर अधिवेशनात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.