पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही

उपमुख्यमंत्री अजित पवरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही,” असे गौरोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना काढले आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवार, ४ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनही केले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही,” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेत थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत.

अजित पवार हे सरकारमध्ये आल्यानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले. मंत्रिमंडळात आमचे कोणतेही मदभेद नाहीत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अजित पवारांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

सोमवार, ३ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकामामुळेच आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे भुजबळ यांनी सांगितलं होते. अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत म्हटले होते की, देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आगेकूच करत आहे. केंद्र आणि राज्य वेगळ्या विचारांचं असतं तर विकास कामात आणि निधीत कमतरता राहाते, त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले होते.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला सुनावले खडेबोल

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?

इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार

भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांनी ५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहायचे की शरद पवारांच्या बैठकीला हजर राहायचे असा गहन प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथे आमदार, खासदार, जिल्हाअध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाराऱ्यांना बोलवले आहे. तर, शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे.

Exit mobile version