पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने

पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने

पुण्यातील आंबील ओढ्याजवळ असलेली घरे महापालिकेने तोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात त्यांचा निशाणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याचे या घडामोडींतून स्पष्ट होत आहे. ज्यांची घरे तुटली आहेत त्या स्थानिकांकडून अजित पवार यांच्या दबावामुळे आपली घरे तुटल्याचा आक्रोश केला जात आहे. तर दुसरीकडे त्याच स्थानिकांना भेटून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून या प्रकरणात तुटलेल्या घरांच्या आडून सुप्रिया सुळे या अजित पवारांवर निशाणा साधत असल्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.

आंबिल ओढ्याजवळ असलेली पाच घरे महापालिकेने कारवाई करत गुरुवारी पाडली. न्यायालयाने स्थगिती आणल्यावर मात्र ते पाडकाम थांबले. एका बिल्डरला ती जागा हवी असल्यामुळे ही घरे पाडण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रारंभी ही कारवाई बिल्डरने केल्याचे वाटत होते. पण नंतर पालिकेने कारवाई केल्याचे उघड झाले. या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले.

हे ही वाचा:

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का

पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या

नव्या निर्बंधांविरुद्ध व्यापारी ‘या’ शहरांमध्ये आक्रमक

मात्र नंतर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुरघोडीचे राजकारण असावे, अशी दाट शंका येऊ लागली. त्याला कारण होते ते म्हणजे, या स्थानिकांनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना यात प्रताप निकम या व्यक्तीचा उल्लेख केला. त्या व्यक्तीने महापालिका आयुक्तांसमोर मी अजित पवार यांचा माणूस आहे आणि माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, असा दावा स्थानिक आंदोलक करत होते. शिवाय, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्याही आंदोलकांकडून होत होत्या. त्यामुळे एकीकडे अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे घरे पाडण्यासाठी दबाव आणला जातो आहे का, अशी शंका उपस्थित होत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे याच आंदोलकांना शांत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसले. पण या विरोधाभासामुळे या घरे पडलेल्या स्थानिकांच्या आंदोलनाआडून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला असल्याचे बोलले जाऊ लागले.

पावसाळा सुरू झालेला असताना आणि कोरोनाचे महाभयंकर संकट असताना पालिकेने अशी कारवाई कार केली, अशी विचारणा आंदोलक करत होते. आमची पाडलेली घरे पुन्हा बांधून द्या, अशी मागणीही आंदोलक करत होते. त्यांनी घोषणाबाजी करत बांधकाम पाडल्याचा निषेध नोंदविला.

Exit mobile version