काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी सीआरझेड आणि पर्यावरण कायदा धुडकावून मालाडमधील मढच्या एरंगळ गावात जो बेकायदेशीर फिल्म स्टुडिओ उभारला आहे, तो उखडून टाकण्यात यावा, अशी मागणी आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केली. त्याशिवाय त्यांनी आणखी दोन मागण्याही यावेळी केल्या.
अस्लम शेख यांच्या अनधिकृत बांधकामासंदर्भातील विषय काही महिन्यांपूर्वी गाजला होता. अस्लम शेख यांनी एरंगळ गावामध्ये तात्पुरता फिल्म स्टुडिओ उभारून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून तसेच खारफुटीचे नुकसान पोहोचवलेले आहे. त्याचप्रमाणे एरंगळ गावातल्या एमआयडीसीच्या जागेवर बेकायदेशीर डंपिंग केले असल्याचा आरोप करण्यात आला होता.
एरंगळ गावात फिल्म स्टुडिओचे तात्पुरते बांधकाम करण्याच्या ३ प्रस्तावांची सीआरझेड शिफारस केली होती. ही वैधता ६ महिन्यांची होती. या प्रकरणात सीआरझेड कायद्याचा भंग झाला आहे का याची पडताळणी करून योग्य ती कारवाईची प्रकिया करावी, असे पर्यावरण खात्यानं मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या निर्देशात नमूद केलेले आहे.
हे ही वाचा:
धनंजय मुंडेंना एकनाथरावांनी कोणता संदेश दिला?
देवगडला मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा
‘कोणताही देव उच्च जातीचा नसतो’
पक्षप्रमुख करणार ‘महाप्रबोधना’ची उठाठेव…
दरम्यान, अमित साटम यांनी आणखी दोन मागण्या करताना गेल्या २५ वर्षांत मुंबई महानगर पालिकेत जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी असे म्हटले आहे. आमदार साटम यांनी महाविकास आघाडीच्या सीसीटीव्ही घोटाळ्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जी परवानगी देण्यात आली होती शिवाय इंटरनेटचे साहित्य खांबांवर बसविण्याची दिलेली परवानगी व इंटरनेट कंपन्यांना ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय याविरोधातही साटम यांनी चौकशीची मागणी केली आहे.