विधिमंडळाच्या अधिवेशनात सोमवारी नितेश राणेंना लक्ष्य करण्यात आले. कणकवलीत नितेश राणेंना अटक करण्याची मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केली जात असताना विधिमंडळात नितेश राणे यांनी निलंबित करण्याची मागणी केली जात होती. शेवटी यासंदर्भात प्रचंड गोंधळ झाल्यामुळे अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले.
नितेश राणे यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या बाहेर घोषणाबाजी करत असताना म्याव म्याव अशा घोषणा दिल्या होत्या. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहाकडे जात असताना त्यांना उद्देशून या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ट्विटरवर नितेश राणे आणि नवाब मलिक यांनी एकमेकांबद्दलची खिल्ली उडविणारी चित्रं शेअर केली होती. त्यावरून सभागृहात बाचाबाची झाली. शिवसेनेचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली. आपल्याबद्दलही नितेश राणे यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा उल्लेख भास्कर जाधव यांनी केला. आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली.
तिकडे कणकवलीतही सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या अटकेची मागणी स्थानिक शिवसेना नेते वैभव नाईक यांनी केली. शिवसैनिकांनी यासंदर्भात स्थानिक पोलिसांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यामुळे एकूणच नितेश राणे हे वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान
सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा
बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?
उत्तर महाराष्ट्रात सापडले २४० कोटींचे घबाड
यासंदर्भात नितेश राणे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीतील मारहाण प्रकरणात नितेश राणे यांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.