सलग दुसऱ्या दिवशीही राजधानी विस्कळीत

सलग दुसऱ्या दिवशीही राजधानी विस्कळीत

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर दिल्लीतील अनेक रस्ते काल बंद करावे लागले होते. त्याबरोबरच विविध मेट्रो स्थानके देखील बंद करावी लागली होती. संध्याकाळी परिस्थिती निवळली असली तरीही आज २७ जानेवारी रोजीही दिल्लीतील काही मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत.

दंगलखोरांनी काल दिल्ली शहरातील वाहतूक व्यवस्था बंद पाडली होती. त्यानंतर आजच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्ग बंद ठेवले आहेत. ट्रॅफिकच्या वेळांत एकाच जागी जाम होऊ नये यासाठी पोलिसांनी सुचना जारी केल्या आहेत.

दिल्ली- गाझियाबाद रस्त्यासोबत गाझिपूर मंडी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९., राष्ट्रीय महामार्ग क्र. २४, गाझिपूर फूल मंडी मार्ग बंद करण्यात आले आहेत. दिल्ली- गाझियाबाद वाहतूक शहादरा, काकरी मोड़, आणि दिल्ली-नोएडा-दिल्ली मुक्त मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली-नोएडा-दिल्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले.

दिल्लीतील विकास मार्ग, दिल्ली गेट आणि ‘इंटर स्टेट बस टर्मिनल आनंद विहार’ येथील उत्तर प्रदेशच्या दिशेची वाहतूक पूर्वपदावर येत असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (डीएमआरसी) लाल किल्ल्याजवळील ‘लाल किल्ला’ मेट्रो स्थानकाचे सर्व दरवाजे बंद केले आहेत.

Exit mobile version