आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० परिषदेदरम्यान उत्तम कामगिरी करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलिसांसाठी प्रगती मैदानात कार्यक्रमाचे आयोजन केले होते

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

दिल्ली पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे सुरेश कुमार यांनी जी-२० परिषदेदरम्यानचे स्वत:चे अनुभव सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील भावूक झाले. पोलिस निरीक्षक सुरेश कुमार यांनी आईऐवजी देशाप्रतिच्या कर्तव्याला प्राधान्य दिले. ते त्यांच्या आईचे अंत्यदर्शनही घेऊ शकले नाहीत. आईच्या मृत्यूनंतरही पाच तास त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली.

 

अशाच प्रकारे मुखर्जी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एसआय पिंकी यांनीही त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांची मुलगी अविका तीन दिवस रुग्णालयात तापाने फणफणत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० परिषदेदरम्यान उत्तम कामगिरी करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलिसांसाठी प्रगती मैदानात भोजन समारंभाचे आयोजन केले होते. या भोजन समारंभाला सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना बोलावले होते. यामध्ये हवालदारापासून ते पोलिस निरीक्षक दर्जाच्या दिल्ली पोलिसांच्या २७५ जवानांचा समावेश होता.

 

 

या समारंभादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जी २० परिषदेदरम्यान कर्तव्य निभावताना त्यांना आलेला अनुभव सांगण्याचे आवाहन पोलिसांना केले. त्यानंतर आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार यांनी त्यांचा अनुभव सांगितला. सुरेश यांची नियुक्ती राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू असलेल्या ‘भारत मंडपम’ येथे करण्यात आली होती. ९ सप्टेंबर रोजी त्यांना नातेवाइकांनी त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. मात्र तरीही ते रुग्णालयात गेले नाहीत. त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या आईचे निधन झाले. मात्र तरीही ते रात्री ११ पर्यंत ड्युटी करत होते. त्यानंतरच ते घरी गेले. त्यांची नियुक्ती इतक्या संवेदनशील जागी होती, की ते ड्युटी सोडून जाऊ शकत नव्हते. सुरेश कुमार यांचा हा अनुभव ऐकताच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आईला स्वर्गात स्थान मिळाले आहे. त्यांना त्यांच्या मुलाचा गर्व वाटेल, अशी भावना व्यक्त केली.

 

हे ही वाचा:

मिरवैझची सुटका करून पाकिस्तानला इशारा

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

नापसंतीच्या शिक्क्याला ट्रुडो स्वतःच कारणीभूत

महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !

तर, एसआय पिंकी यांची ड्युटी तुर्कीचे राष्ट्रपती यांच्या पत्नीसोबत होती. तुर्कीचे राष्ट्रपती जिथे कुठे गेल्या, तिथे त्या सोबत होत्या. त्यांची दोन वर्षांची मुलगी अविका हिला ८ सप्टेंबर रोजी ताप आला होता. तरीही त्या ड्युटीवर आल्या. मुलगी त्यांना जाऊ देत नव्हती. तरीही त्यांनी ९ आणि १० सप्टेंबर रोजी ड्युटी केली. त्या रात्री केवळ तीन तासांसाठी घरी जात होत्या. मुलीला पाहून वाईट वाटायचे, मात्र देशासाठी कर्तव्य निभावणे अधिक महत्त्वाचे होते, असे त्या म्हणाल्या.

 

पंतप्रधानांसोबत भोजन केल्यानंतर जोश

पंतप्रधान मोदींसोबत भोजन केल्यानंतर जोश संचारल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे वाहतूक पोलिस कुलदीपसिंग यांनी दिली. पंतप्रधानांना पहिल्यांदाच जवळून पाहता आले. त्यांनी आमच्या विभागाचे कौतुक केल्यानंतर समाधान वाटले, असे ते म्हणाले.

Exit mobile version