प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसेत शेतकरी नेत्यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केला आहे. २६ जानेवारी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारा संदर्भात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दिल्लीचे पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हिंसक आंदोलनाचा घटनाक्रम पोलिसांनी उलगडला आहे. दंगलीतील दोषींपैकी कोणाचीही गय केली जाणार नाही असे पोलिसांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे.
२६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी द्यायला पोलीस प्रशासन तयार नव्हते. या संदर्भात पोलीस प्रशासन आणि आंदोलक नेत्यांमध्ये बैठकींच्या पाच फेऱ्या झाल्या. पण आंदोलकांचे नेते हे रॅलीच्या मागणीवर अडून राहिले होते. अखेर माध्यम मार्ग काढत पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने परेड काढायला परवानगी दिली. सोबतच या साठीची नियमावलीही नेत्यांना लिखीत स्वरूपात देण्यात आली. यात रॅलीचा रस्ता, वेळ या सोबतच ५ हजार पेक्षा जास्त ट्रॅक्टर नसावेत, कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्रे नसावीत अशा प्रकारचे निर्बंध ठेवण्यात आले होते. आंदोलकांच्या नेत्यांनी हे निर्बंध आणि नियम मान्य केले पण नंतर त्यांनी याचे पालन केले नाही अशीही माहिती पोलिसांनी दिली.
#WATCH live: Delhi Police addresses the media regarding the violence during farmers' tractor rally yesterday. https://t.co/vzt5Umpt4q
— ANI (@ANI) January 27, 2021
राजधानीत झालेल्या हिंसेचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून फेस रेकग्निशन सिस्टिमचा वापर करून दोषींची ओळख पटवली जाईल अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिली. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३९४ पोलीस अधिकारी जखमी झाले असून, या संदर्भात २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली असून ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचा तपास सुरु असून तपासात आणखीन काही नावे समोर येतील. या हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल असेही पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले.