कंझावाला प्रकरणी पोलिसांनी तातडीने अहवाल सादर करावा; अमित शहांचे आदेश
राजधानी दिल्लीत झालेल्या कंझावाला अपघातात तरुणीचा जीव गेला. तरुणीला धडक देणा-या कारने तिला १२ किमीपर्यंत फरफटत नेले. यामुळे तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. तिचे पाय कापले गेले आणि तिच्या अंगावरचे कपडेही फाटून गेले. तिचा मृतदेह पोलिसांना नग्न अवस्थेत मिळाला. या सगळ्या प्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री “अमित शहा” यांनी या अपघात प्रकरणाचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके काय झाले?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या कंझावाला भागात एका तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. हा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. ही मुलगी आपल्या स्कुटीवरुन घरी चालली होती, त्यावेळी तिला ज्या कारने धडक मारली त्या कारने तिला १२ किमीपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांना ज्याठिकाणी या तरुणीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर एक स्कुटीही सापडली असून, स्कुटीच्या नंबरवरुनच तरुणीची ओळख पटली आहे
.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री “अरविंद केजरीवाल” यांनी आज या पीडितेच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि दिल्ली सरकार खटला लढण्यासाठी सर्वोत्तम वकील नियुक्त करेल असेही सांगितले. पीडितेच्या आईशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल. याशिवाय भविष्यातही काही गरज भासल्यास आम्ही त्यांना अवश्य मदत करू,” असे केजरीवाल यांनी हिंदीत ट्विट करून सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’
छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग
‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे
याप्रकरणी पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक केली आहे. कारच्या नंबरवरुन पोलिसांनी आरोपींना शोधले आहे. मात्र, या प्रकरणात अनेक मुद्द्यांवर त्यांची चौकशी बाकी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे स्पष्ट केले आहे की, पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर अहवाल सादर करावा.