समता पक्षाने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. म्हणजेच आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणूक चिन्ह हेच निवडणूक आयोगाने दिलेली धगधगती मशाल राहणार आहे.
निवडणूक आयोगाकडून उद्धव गटाला निवडणूक चिन्ह म्हणून ‘मशाल’ मिळाली आहे. त्यावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी म्हटले आहे की, पक्षाची मान्यता २००४ मध्ये संपुष्टात आल्यापासून समता पक्ष चिन्हावर कोणताही अधिकार सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. कारण समता पक्षाची स्थापना १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह वाटप केले होते, तसेच त्यांच्या कॅम्पचे नाव ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे ठेवले होते. त्याचवेळी ‘दोन तलवारी आणि ढाल’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले. त्याचवेळी पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे देण्यात आले.
हे ही वाचा:
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) नवीन नावे आणि चिन्हांचे वाटप केले. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल निशाण, तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर समता पक्षाने ‘मशाल’ निवडणूक चिन्हावर आपला दावा ठोकला होता. आणि त्यांच्या पक्षाचे ‘मशाल’ हे आधीच निवडणूक चिन्ह असताना ते उद्धव ठाकरे गटाला कसे देता येईल, असा प्रश्न उपस्थित केला. समता पक्षाने ‘मशाल’ चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता समता पक्षाला मोठा झटका बसला आहे.