देशातील कृषी कायदा सुधारणांविरोधात कथित शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. मागील खेपेचा अनुभव असल्याने यावेळी पोलिसांनी जय्यत तयारी चालू केली आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त दिल्लीतून शांततेने ट्रॅक्टर रॅली काढू या सांगण्याला हरताळ फासून, आंदोलकांमार्फत भयंकर हिंसाचार घडवला गेला. यात मोठ्या प्रमाणात पोलिस जखमी झाले. त्याशिवाय अनेक सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसची तसेच खासगी वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. शेतकरी आंदोलकांच्या शांततेचा अनुभव आल्यानंतर पोलिसांनी चक्का जाम साठी जबर तयारी केली आहे.
आंदोलनस्थळी अनेक बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्याबरोबर तारांची वेटोळी, खंदक, खिळे अशी जोरदार तयारी सीमेवरील कथित शेतकऱ्यांना दिल्लीत शिरण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आली आहे. पोलिसांनी अफवा पसरू नयेत यासाठी देखील तयारी चालू केली आहे.
एक हजार पोलिसांच्या तैनाती सोबतच १५ हजार रॅपिड ऍक्शन फॉर्सच्या निमलष्करी दलाचे जवान सीआरपीएफचे जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान देखील तैनात केले आहेत.
एकूण चाळीस संस्थांची एक संघटना झालेल्या संयुक्त किसान मोर्चा तर्फे जरी दिल्लीत चक्का जाम करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले असले तरीही, २६ जानेवारी रोजी घडलेला अत्यंत घृणास्पद प्रकार लक्षात घेता यावेळी पोलिसांनी तयारी केली आहे.