शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांना इशारे देत आहेत. संजय राऊत हे या आमदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य देखील करत आहेत. यावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“संजय राऊत यांची वक्तव्ये ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देत नाहीत. त्यांची वक्तव्ये ही अतिशय घाणेरडी आहेत. महाराष्ट्राने महिलांचा नेहमी आदर केला आहे. संजय राऊत यांची भाषा ही न उच्चारण्यासारखी आहे. संजय राऊत करत असलेल्या वक्तव्यांनंतर शिवसेना कशी शिल्लक राहील? शिवसेना पक्ष प्रमुखांना असा प्रवक्ता चालतो का?” असे प्रश्न दीपक केसरकर यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेला चांगला प्रवक्ता मिळावा हीच प्रार्थना आहे, अशी सणसणीत टीका दीपक केसरकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर केली आहे.
“तुम्ही पातळी सोडून बोलाल तर आम्हाला पण बोलता येतं. तुम्ही कधीही जनतेतून निवडून आलेला नाहीत. तुम्हाला राज्यसभेत ४१ मतं मिळाली ती आमचीच आहेत. पण तुम्हाला आमची प्रेतं बघायची आहेत तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणून या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आहेत तर निवडून या,” असा घाणाघात दीपक केसरकर यांनी केला आहे.
हे ही वाचा:
बंडखोर आमदारांवरील कारवाईची वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू
उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?
आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी
बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे कडे
“संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे लोक रस्त्यावर उतरायला लागलेत. उद्या या कार्यकर्त्यांवर लावलेल्या केसेसमुळे ते न्यायालयात आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालतील आणि हे बसतील बंगल्यात,” असा सणसणीत टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
“भाजपाला सत्ता मिळाली नाही तेव्हा भाजपाचे लोक रस्त्यावर उतरले नाहीत. त्यांनी दंगली केल्या नाहीत. लोकांनी शिवसेना आणि भाजपाला मतं दिली होती. ही वस्तुस्थिती आहे,” अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.