देशात जातीनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत चाललाय. विशेषत: ओबीसी नेते त्यासाठी आग्रही आहेत. कोणत्या जातीचे किती लोक राज्यात आहेत याचा कुठलाही ठोस आकडा हाती नसतानाही, योजना मात्र जातींच्या नावावर दिल्या जातायत. आरक्षणाची घोषणाही कुठल्याही आकडेवारीशिवाय केली जातेय. त्यामुळे योजना, त्यावरचे निर्णय, आरक्षण अशा सगळ्याच गोष्टींमध्ये विरोधाभास होतोय. त्याच पार्श्वभूमीवर जातीनिहाय लोकसंख्या मोजावी अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलीय.
त्यासाठीच ते आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतायत. त्यांच्यासोबत एक सर्वदलिय शिष्टमंडळही आहे. खूप काळानंतर नितीशकुमार दिल्लीत आहेत. कधीकाळी मोदीविरोधी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण त्यांनी मात्र बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरच समाधान मानलं. अधूनमधून कुरबुऱ्या तिथेही होतात. त्याच पार्श्वभूमीवर नितीशकुमारांसोबतच्या आजच्या शिष्टमंडळात तेजस्वी यादव आहेत. त्यांच्या उपस्थितीचीही खास चर्चा होतेय.
जातिनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आज दिलं. नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जातिनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
हे ही वाचा:
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी
ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे
केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशभरात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजतोय. विशेषतः ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर जातिनिहाय जनगणनेचं काय होणार? आणि केंद्रानं ती लवकर करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून, विविध राज्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या एका शिष्टमंडळानं आज पंतप्रधानांची भेट घेतली.