अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा

अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा

ठाकरे सरकारच्या एकेका मंत्र्यांवर कागदपत्र घेऊन आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमैय्या आज पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्र्यांवर कडाडले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, कोल्हापूरचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटीहून अधिकची संपत्ती आहे. ८ पेक्षा जास्त शहरात त्यांचं बेनामी साम्राज्य पसरलं आहे. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

“अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्य ८ पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा. असं ट्वीट करत सोमय्या यांनी अजित पवारांसमोर अनेक सवाल उभे केले आहेत.

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या अनेक नातेवाईकांच्या खात्यात अमाप पैसा जमा झाल्याचा आरोप सोमैय्या यांनी परवाच केला होता. गेले १९ दिवस सुरु असलेल्या आयटी आणि ईडीच्या छाप्यांमध्ये १०५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात, अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, आई आशाताई पवार, बहीण विजया पाटील, जावई मोहन पाटील आणि बहीण नीता पाटील यांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची (शंभरहून अधिक) आवक झाल्याचे समोर आले आहे. याविषयी किरीट सोमैय्या यांनी पत्रकही जारी केले आहे.

हे ही वाचा:

बामियान बुद्धाच्या जागी आता ‘शूटिंग रेंज’

हक्कानी नेटवर्कच्या ‘या’ नेत्याचा काबूलमध्ये खात्मा

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

किरीट सोमैय्या गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप करताना दिसत आहेत. सोमैय्या हे या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवार, २० ऑक्‍टोबर रोजी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सोमैय्या यांनी हे जाहीर केले की दुपारी दोन वाजता ते ईडीच्या कार्यालयात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात तक्रार दाखल करणार आहोत. तर यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक संचालकही उपस्थित राहणार असल्याचा दावाही सोमैय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात तक्रार दाखल करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केले आहेत.

Exit mobile version