स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव व्यक्तिमत्व असं होते ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही तुरुंगवास भोगला. मात्र, काँग्रेसने सावरकरांच्या विचारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, जे आजतागायत सुरू आहे, असं भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जमिनीत गाडण्याचा इशारासुद्धा यावेळी फडणवीसांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, अंदमान तुरुंगात काळ्या पाण्याची दुहेरी शिक्षा भोगत असताना ११ वर्षे सावरकरांसारखाच यातना सहन करणारा काँग्रेसचा नेता दाखवा. सावरकर अंदमान तुरुंगात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केल्या असत्या. त्यांना धीर देण्याचे काम सावरकरांनी केले.
पुढे फडणवीस म्हणाले, राहुल गांधींना सावरकरांचा ‘स’ माहीत नाही. मात्र, तरीही त्यांचा अपमान करण्याचे काम सुरू आहे. आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ. जोपर्यंत हिंदू संघटित होते, तोपर्यंत त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही केले नाही. पण हिंदूंचे ऐक्य कमकुवत झाल्यावर आपला देश गुलाम झाला. म्हणूनच सावरकरांनी हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. सावरकरांनी नेहमी विज्ञानाची पूजा केली. त्यांनी हिंदू समाजातील अवैज्ञानिक प्रथांना विरोध केला. बाळासाहेबांनीही या प्रथेचे समर्थन केले नाही. सावरकरांचे हिंदुत्वाचे सूत्र बाळासाहेबांनी पुढे नेले असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना
कीर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे संजय निरुपमना संताप
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस करणार आफताबची नार्को टेस्ट
बाळासाहेबांना स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचा खूप अभिमान होता. पण उद्धव ठाकरे सावरकरांना विसरले. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतरही आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना मिठी मारली. बाळासाहेबांना त्यावेळी काय वाटलं असेल असा सवाल फडणवीसांनी केला. तुम्हाला बाळासाहेबांशी संबंधित असण्याचा अधिकार नाही, असे बोलही फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले आहेत.