वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला हलवण्यात आला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होतं आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मतं मांडल आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला आहे, अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली आहे. तसेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे पाप असल्याचं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. आपल्या राज्यात रिफायनरीलाच विरोध करण्यात आला होता. मी स्वतः याबद्दल अनिल अग्रवाल यांच्याशी बोललो होतो. त्यांना हेही म्हटलं होतं की गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज महाराष्ट्रात देतो. त्यावर ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात नक्कीच गुंतवणूक करू, पण आता आमचा निर्णय़ झालेला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
अनिल अग्रवाल यांचा निर्णय़ आमचं सरकार येण्याच्या आधीच झाला होता. आम्ही आल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोट दाखवत आहेत. तुमच कर्तृत्व काय आहे? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे पडला आहे. उद्धव ठाकरेंच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली आहे. पुढील दोन वर्षात महाराष्ट्राला आम्ही पुढे नेऊ, असंही आव्हान यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.
हे ही वाचा:
चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी
बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात
जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द
राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अडचणी मी सोडणार आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करायची असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करावी लागेल असं फडणवीसांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन झाल्याशिवाय भारत ५ ट्रिलियन होणार नाही. त्यासाठी मिळून काम करावं लागेल. ते करण्याची पूर्ण मानसिकता आमची असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.