भाजप – शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. वेळ येताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सर्व जागा पंतप्रधान मोदींच्या पारड्यात टाकू असे विधान केलं. या विधानाचा चुकीचा अर्थ लावत त्यावर राजकीय वर्तुळात उमटसुलट चर्चांना वेग आला आहे. वेळ येताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल असे सांगून फडणवीस यांनी विरोधकांचे तोंड गप्प केलं आहे.
शिवसेना पक्ष अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजप आणि शिवसेना युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून वेगळेच तर्क लावण्यास सुरुवात झाली. सर्वच जागा भाजपला गेल्या तर शिवसेनेच्या पदरात काय पडणार अशा कंड्या पिकवण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. त्याचा समाचार फडणवीस यांनी घेतला.
गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानासंदर्भात माध्यमांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले. कोणताही संभ्रम होऊ नये या करीतच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलंय त्यांनी. मोदींच्या पारड्यात टाकताना एनडीए म्हटलं आहे.त्यामुळे कृपया संभ्रम निर्माण करू नका. तो होणार नाही. आमचा सगळा फॉर्म्युला ठरला आहे तो आम्ही योग्यवेळी जाहीर करू. योग्य प्रतिनिधित्व मिळेल. जसे मागच्या काळात शिवसेनेला मिळाले तसे प्रतिनिधित्व शिवसेनेला मिळत राहील असेही फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
आमचे कुणी शत्रू नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो
सामना दैनिकात अमित शहा महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे,अशी टीका करण्यात आली होती. त्याचा समाचार घेताना फडणवीस यांनी कोणाला काय मानायचे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे. आम्ही कधी कोणाला शत्रू मानले नाही. ते एक नंबरचे शत्रू मानत असतील तर मानू द्या. आम्ही वैचारिक विरोधक मानतो, त्यांनी शत्रू मानायचे तर मानावे असा उपरोधिक टोला लगावला.