पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चाही नॅनो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चाही  नॅनो

महाविकास आघाडी सरकारने महापुरुषांच्या अवमानच निषेध करण्यासाठी महामोर्चा काढला होता . तिन पक्ष एकत्र येऊन इतका लहानसा मोर्चा निघाला. तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या. पण, त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. आझाद मैदानाचा एक कोपराही त्यांना भरता आला नसता,अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उध्दवजीना दिसलं असा प्रश्न विचारत फडणवीस यानी जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा नॅनो मोर्चा होता असा टोला लगावला आहे.

जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी सांप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही अशा प्रकारे ही मंडळी आज कोणत्या तोंडाने हा मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राची जी मानके आहेत त्यांचा अपमान होऊच नये या मताचे आम्हीही देखील आहोत पण ते जर कोणी करत असेल तर ते योग्य नाही पण जाणीवपूर्वक त्याला राजकीय मुद्दा बनवला जात आहे. हा संपूर्णपणे राजकीय मोर्चा होता अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

काँग्रेसने रोज स्वातंत्र्य वीर सावरकारांचा अपमान केला त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला? त्यावेळी तुम्ही त्यावर का नाही बोललात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? असा सवाल करत फडणवीस यांनी, केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटक आणि सीमावाद हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही हे आज हे तिन्ही पक्ष विसरले. तो गेल्या ६० वर्षांपासून आहे.वारंवार राज्य करणाऱ्यांनी त्यात काहीही केलं नाही आता कोणत्या तोंडाने ते सांगत आहेत. मुद्दे न उरल्यामुळे निव्वळ राजकीय दृष्टीने काढलेला हा मोर्चा आहे अशा शब्दात फडणवीस यांनी हल्ला चढवला. सीमाप्रश्न निर्माण करण्यासाठी काँग्रेसचं जबाबदार आहे. कशा प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि त्यानंतर केला हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. सीमाप्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे असेही फडणवीस म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांची कॅसेट १० वर्ष तिथेच अडकलेली
उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले , उद्धव ठाकरे यांची कॅसेट तिथेच अडकली आहे आणि गेली १० वर्ष तिथेच अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही हे त्यांना माहिती आहे.भारताचे संविधान सर्वोच्च आहे हे माहिती असताना किती दिवस तेच डायलॉग ते मारणार आहेत आणि आजच्या त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही. केवळ शिवराळ भाषा वापरायची तेवढ्यापुरते त्यांनी भाषण केले आहे. त्यांनी आता काही नवीन लोक नियुक्त करावेट जे त्यांना दोन चार नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील. भाषणात काही तरी नवीन ऐकण्यासारखे वाटेल. एखाद्या मोठ्या नेत्याने भाष्य केलं आहे असे वाटेल असे उद्धवजी बोलतील अशी माझी माफक अपेक्षा आहे असा उपरोधिक टोलाही फडणवीस यांनी लगावला.

आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार
ज्यांना त्यांचं सरकार टिकवता आलं नाही आम्ही त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि सरकार स्थापन केलं. सरकार टिकणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच नेतृत्वात पुन्हा निवडणूक लढणार पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार.

Exit mobile version