मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे कै. दत्ताराम दुदम सर यांना समर्पित “अजिंक्यतारा चषक निमंत्रित मल्लखांब स्पर्धेचे” आयोजन रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी, बीमा नगर एज्युकेशन सोसायटी, एल.आय.सी. कॉलनी शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली पश्चिम, मुंबई ४००१०३ येथे सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत होणार आहे.
मल्लखांब लव संघ आणि बीमा नगर एज्युकेशन सोसायटी हे प्रमुख आयोजक असुन बोरीवली तालुका मल्लखांब महासंघ हे सह आयोजक म्हणून काम पाहत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील नामांकित २२ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. अंदाजे ४०० खेळाडू आपले मल्लखांब कौशल्य सादर करतील. या स्पर्धेची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे सहभागी प्रत्येक खेळाडूला आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे आणि दुसरे म्हणजे नवोदित खेळाडूंपासुन जिल्हा/राज्य/राष्ट्रीय विजेते असे सर्व खेळाडू सदर स्पर्धेत सहभागी होतील.
राजकीय, सामाजिक, शासकीय, क्रीडा, कला, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हि स्पर्धा पार पडणार आहे. कै.दुदम सरांचे सगळे शिष्य हि स्पर्धा आयोजित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
हे ही वाचा:
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग
या स्पर्धेला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी,आमदार आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष विजय गिरकर, आमदार मनीषा चौधरी, सुनील राणे, स्थानिक नगरसेवक हरीश छेडा तसेच प्रतिभाताई गिरकर, कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर, प्रशांत पाटील आणि चेतन मटालिया ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.