महाराष्ट्रातील अस्थिर राजकारणानंतर आता प्रत्येक क्षणी नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून भूमिका मांडली आहे.
दरेकर यांनी पत्र लिहून कळविले आहे की, राज्य सरकारमार्फत अंधाधुंद कारभार सुरू आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहेत. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त प्रकाशित झाले आहे. गेल्या ४८ तासांत १६० पेक्षा अधिक शासनआदेश जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्षे निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीबद्दल आपण लक्ष द्यावे. पोलिस दल आणि महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा घाटही घातला जात आहे. पोलिस दलातील महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तुरुंगात जावे लागले होते.
राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत मा. राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र. @BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/oJ7YG3QSmp
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 24, 2022
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा अशी नम्र विनंती आहे, असे या पत्राच्या अखेरीस नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गेम कुणाचा???
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
पांडुरंगाची पूजा कोणते मुख्यमंत्री करणार?
दरेकर यांनी हे पत्र लिहून महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये राज्यपाल महोदयांनी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ४६ आमदारांनी गुवाहाटी गाठल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारने बहुमत गमावल्यामुळे सरकार कोसळेल असे म्हटले जात आहे. पण अद्याप त्याविषयी कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट मुंबईतही दाखल होईल आणि आपण म्हणजेच शिवसेना आहोत, असा दावा दाखल करेल अशी शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच आपला गट हाच शिवसेना असल्याचे म्हटले आहे.