राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आता नव्या वादात सापडले आहेत. दिवाळीनिमित्त परळी, बीड येथे मुंडे यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन, फराळ कार्यक्रमात सपना चौधरी या हरयाणाच्या कलाकाराचा डान्स ठेवण्यात आला होता. एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, अशा परिस्थितीत डान्सरचा कार्यक्रम करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार केला जात असल्याचा संताप व्यक्त होतो आहे.
यासंदर्भात भाजपा नेते आणि शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात अनेक गंभीर प्रश्न असताना एका मंत्र्याला असे कार्यक्रम ठेवणे शोभते का? सामाजिक मंत्र्यांचे भान हरवले आहे का?
मेटे म्हणाले की, धनंजय मुंडे हे सामाजिक खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी आपल्या पदाचे भान राखायला हवे. बीड जिल्ह्यात अनेक मोठे प्रश्न आहेत. त्याकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे अशा प्रकरणात लक्ष घातले पाहिजे.
मेटे यांनी सांगितले की, अहमदनगर येथे रुग्णालयाला आग लागली. त्यात लोकांचा होरपळून मृत्यू झाला. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली पण मंत्री मात्र सपना चौधरीला ठुमके लावायला सांगत आहेत, हे अजब आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?
भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून
हरयाणाची कलाकार असलेली सपना चौधरी हिचा हा नृत्याचा कार्यक्रम परळीत आयोजित करण्यात आला होता. त्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.