भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचा पंजाबचा उमेदवार असेल, अशी घोषणा आम आदमी पक्षाने केली आहे. हरभजन सिंगने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच हरभजन सिंगला पंजाबमधील क्रीडा विद्यापीठाचा प्रमुख बनवण्याची जोरदार चर्चाही रंगली आहे.
आम आदमी पक्षाला या महिन्याच्या अखेरीस राज्यसभेच्या पाच जागा मिळणार आहेत. ज्यासाठी हरभजनचे नाव पहिले उमेदवार म्हणून समोर आले आहे, ज्याला पक्षाच्या हायकमांडनेही मान्यता दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज हरभजन सिंग राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता या चर्चेला विराम लागला आहे.
पंजाबचे नवीन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी शपथ घेतल्यानंतर राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. भांगवत मान आणि हरभजन सिंग हे चांगले मित्र मानले जातात. निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भगवंत मान यांच्या विजयाबद्दल हरभजनने ट्विट करून अभिनंदनही केले होते.
हे ही वाचा:
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
या गायिकेला पंकजा मुडेंनी घेतले दत्तक!
सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा
गेल्या वर्षी जेव्हा हरभजन सिंग याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हाच त्याच्या राजकारणात येण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तर त्यापूर्वी हरभजन सिंग भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही अफवा पसरली होती. यानंतर स्वतः हरभजन सिंगने स्पष्ट केले होते तो म्हणाला होता की, मला पंजाबची सेवा करायची आहे. एकतर राजकारणातून किंवा अन्य मार्गाने. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता मात्र सगळे स्पष्ट झाले आहे.